पुणे : योग हा सर्वांसाठी उपयुक्त आहे. मात्र महिलांसाठी योगाचा उपयोग कशा प्रकारे होउ शकतो, महिलांना योग कशा पद्धतीने करावा, याचे मार्गदर्शन करीत महिषासुरमर्दिनी स्तोत्रावर व आदियोगी रचनेवर ‘योगा नृत्य’ योगसाधकांनी सादर केले.
सिंहगड रस्त्यावरील मंजिरीज् योगवर्गातर्फे जागतिक योगदिनानिमित्त आर. एस. स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे ‘योगा नृत्य’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनिषदांचे अभ्यासक आदित्य शेंडे, आहारतज्ञ जान्हवी अक्कलकोटकर, योग वर्गाच्या संचालिका मंजिरी दामले आदी उपस्थित होते.
यावर्षीचा योगदिनाचा विषय महिला सक्षमीकरण हा होता. त्यामुळे सर्व साधकांनी मिळून महिषासुरमर्दिनी स्तोत्रावर व आदियोगी या रचनेवर आधारित योगानृत्याचे सादरीकरण केले. यावेळी मनाची भक्कमता वाढवणे हेच योगासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे सांगत योग का करावा ? महिलांसाठी त्याचा कसा उपयोग होतो? त्याचे महत्व काय आहे? याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विनया देशपांडे व तन्वी गोडबोले यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.