मराठी चित्रपट रसिकांसाठी एक खास आनंदाची बातमी! ‘अष्टपदी’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ३० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर, ट्रेलर आणि गीत-संगीताने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. ‘अष्टपदी’च्या माध्यमातून प्रेमाच्या गुलाबी नात्याचे आजवर कधीही न उलगडलेले पैलू मोठ्या पडद्यावर साकारले जाणार आहेत.

महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी ‘अष्टपदी’ची निर्मिती केली असून, दिग्दर्शनाची धुरा देखील उत्कर्ष जैन यांनीच सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांचे आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर, विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे आदी कलाकार विविध व्यक्तिरेखांमध्ये झळकणार आहेत.
‘अष्टपदी’मध्ये प्रेम आणि नातेसंबंधांचे वेगळे रंग दाखवण्यात आले आहेत. आजच्या तरुणाईपासून ते सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावणारे संवाद, प्रसंगानुरूप घटनाक्रम, आणि अर्थपूर्ण कथा हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. दिग्दर्शक उत्कर्ष जैन यांच्या म्हणण्यानुसार, ‘अष्टपदी’ समाजातील विविध घटकांचे प्रतिबिंब मोठ्या पडद्यावर दाखवतो. या चित्रपटाच्या यशात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी मेहनत घेतली आहे.
चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी सुमधूर स्वरसाज दिला आहे. सिनेमॅटोग्राफी धनराज वाघ यांनी, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांनी, तर वेशभूषा अंजली खोब्रेकर आणि स्वप्ना राऊत यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, ‘अष्टपदी’ला मिळणाऱ्या आर्थिक यशातील काही हिस्सा राष्ट्रीय संरक्षण निधीला देण्याचा निर्णय निर्माते उत्कर्ष जैन यांनी घेतला आहे.
प्रेम, नातेसंबंध, संगीत आणि कौटुंबिक मूल्यांचा संगम असलेला ‘अष्टपदी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरणार आहे.