पुणे : दशावतार चित्रपटाची संकल्पना माझ्या मनाला भावली. दशावतार कला प्रकाराविषयी मी ऐकून होतो; परंतु प्रत्यक्षात मी हा कलाप्रकार कधीही पाहिला नव्हता. त्यामुळे चित्रपटातील बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारताना आव्हाने घेता येतील याचा वास मला लागला. या भूमिकेत काही तरी करण्यासारखे आहे, असे जाणवल्याने मी ही भूमिका स्वीकारली, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या.कोकणातील परंपरा, वारसा, संस्कृती, पर्यावरण रक्षण यावर भाष्य करणारा २०२५ मधील बहुचर्चित चित्रपट ‘दशावतार’ शंभर दिवसांचा नाबाद प्रवास पूर्ण करीत आहे. त्या निमित्त कोहिनूर कट्टा प्रस्तुत ‘दशावतार १००’ या कार्यक्रमाअंतर्गत चित्रपटातील कलाकारांशी संवाद आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा आज (दि. २४) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी दिलीप प्रभावळकर बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम, लागू बंधूंचे सारंग लागू तसेच संयोजक वीरेंद्र चित्राव यांची विशेष उपस्थिती होती. कोहिनूर ग्रुप, एनएफडीसी आणि लागू बंधू यांच्या सहकार्याने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दृक्-श्राव्य कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांच्यासह दिग्दर्शक सुबोध खानोलकर, निर्माता सुजय हांडे, कलाकार सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर यांचा सहभाग होता. त्यांच्याशी अजित भुरे यांनी संवाद साधला. यावेळी चित्रपट निर्मितीतील काही क्षण व प्रसंग दाखविण्यात आले.
कलाकारांची दाद मोलाची ठरली : दिलीप प्रभावळकर
‘बाबुली मेस्त्री’ या भूमिकेसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक तयारी करावी लागल्याचे सांगून प्रभावळकर पुढे म्हणाले, मानसिकता तयार करताना चित्रपटाची संहिता कामी आली. तर भावनिकता तयार करताना दिग्दर्शकाचे मार्गदर्शन आणि तरुण सहकलाकारांचे सहकार्य लाभले आणि त्यांच्यातील उत्साह व उर्जेची लागण झाली. चित्रपटातील भूमिकेसाठी स्वत:ला तयार करताना दशावताराचा प्रत्यक्ष प्रयोग पाहणे, त्यातील अनेक कलाकारांच्या भेटी घेणे तसेच दशावतारी कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा करणे तसेच मिताभिनय आणि जोरकस अभिनय यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला. दशावतारी सादर करणाऱ्या कोकणातील मूळ कलाकारांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘तुम्ही आमचे प्रतिनिधीत्व केले’ अशी मिळालेली दाद माझ्यासाठी मोलाची ठरली.सुबोध खानोलकर म्हणाले, माझे आजोळ कोकणातील असल्याने मी अनेकदा दशावताराचे रंगलेले प्रयोग अनुभवले आहेत. त्यामुळेच मला या कलाप्रकाराविषयी आकर्षण निर्माण झाले. कोकणातील दशावतार जगाला कळावा तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागृती व्हावी या हेतूने चित्रपटाची निर्मिती केली.सुजय हांडे म्हणाले, कथेतील गाभा रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उर्मीने हा चित्रपट जास्तीतजास्त प्रमाणात प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला.सिद्धार्थ मेनन म्हणाला, या चित्रपटातील भूमिका साकारताना भाषेचा लहेजा शिकलो. चित्रपटातील भूमिकेविषयी विचार केला, अभ्यासपूर्ण निरिक्षण केले आणि भूमिका साकारली.प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली, या चित्रपटाची कथा ऐकल्याबरोबरच माझ्यातील कलाकाराची भूक जागृत झाली आणि आपल्यातील सर्वोत्तम देऊन भूमिका साकारायची या एकाच ध्येयाने अभिनय केला.
निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न : डॉ. गुरुदास नूलकर..
डॉ. गुरुदास नूलकर म्हणाले, आज संपूर्ण जगासमोर अनेक पर्यावरणीय आव्हाने उभी ठाकली आहेत. ज्यात जल, जमीन, जंगल यासह जन आणि जानवर यांचाही विचार होणे आवश्यक आहे. दशावतार चित्रपटात पर्यावरणाला मूळ बिंदू मानले आहे. पर्यावरणीय ऱ्हास सुरू असताना, नैसर्गिक संसाधने नष्ट होत असताना हा चित्रपट पृथ्वीशी पुन्हा एकदा नाते कसे प्रस्थापित होईल हे सांगत निसर्गाशी जोडून घेण्याचा वेगळा दृष्टीकोन समोर आणतो आहे.
वैश्र्विक भाष्य करणारा चित्रपट : कृष्णकुमार गोयल..
वर्षभरात मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या ढंगांचे चित्रपट निर्माण होत असतात. त्यातील मोजकेच चित्रपट यशस्वी आणि रंजक ठरतात. दशावतार हा उच्च निर्मिती मूल्य असलेला, पर्यावरणविषयक वैश्र्विक भाष्य करणारा चित्रपट आहे, असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.
समाजभान जागविण्यासाठी आशयघन कार्य – प्रकाश मगदूम..
प्रकाश मगदूम म्हणाले, मराठी चित्रपटांचा दर्जा व गुणवत्ता या संदर्भात कायमच चर्चा होत असते. दशावतार या चित्रपटाने चांगला विचार प्रेक्षकांसमोर आणत आशयपूर्ण चित्रपट निर्मिती होऊ शकते हे सिद्ध केले आहे. या चित्रपटाद्वारे समाजभान जागविण्यासाठी आशयघन कार्य केले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीत सध्याच्या काळात मल्याळम भाषेतील चित्रपटांना गुणवत्तामापन समजले जाते. दशावतार हा चित्रपट मल्याळम भाषेत आला आहे हे विशेष उल्लेखनीय आहे.
योगायोग आणि मोलाचा क्षण : वीरेंद्र चित्राव..
स्वागतपर प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, मराठी चित्रपट सृष्टीत चांगला चित्रपट निर्माण होणे आणि त्याने उत्तम व्यवसाय करणे ही तफावत आजही दिसून येते. परंतु दशावतार हा चित्रपट शंभर दिवसांचा नाबाद प्रवास पूर्ण करत आहे हा क्षण मोलाचा वाटल्यामुळे कोहिनूर कट्टा या माध्यमातून विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आशय फिल्म क्लबच्या वतीने सातत्याने मराठी चित्रपट सृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात येतो. दशावतार चित्रपट प्रदर्शनाला शंभर दिवस पूर्ण होत असतानाच आशय फिल्म क्लबचाही शंभरावा कौतुक सोहळा आहे, हा एक विलक्षण योगायोग आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
बाबुली मेस्त्री भूमिका आव्हानात्मक वाटल्याने ‘दशावतार’ स्वीकारला : दिलीप प्रभावळकर
New Delhi
clear sky
15.7
°
C
15.7
°
15.7
°
30 %
1.9kmh
1 %
Fri
15
°
Sat
21
°
Sun
21
°
Mon
21
°
Tue
22
°


