पुणे, -: पंचकर्म फिल्म्सला आपल्या ‘हिज स्टोरी ऑफ इतिहास’ (His Story of Itihaas) या विचारांना प्रवृत्त करणाऱ्या चित्रपटाच्या पोस्टरचे पुण्यात अनावरण करताना आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अभिमान वाटत आहे. सत्यकथेवरून प्रेरित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनप्रीत सिंग धामी यांनी केले आहे. हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्यासह आकांक्षा पांडेय, किशा अरोरा, अंकुल विक आणि योगेंद्र टिक्कू आदी कलावंतांनी अभिनय केलेला हिज स्टोरी ऑफ इतिहास हा चित्रपट सत्य, इतिहास व शिक्षणपद्धती या विषयांवर चर्चा घडवून आणण्याची तसेच गंभीर विचार करण्यास प्रेक्षकांना प्रवृत्त करण्याची ग्वाही देतो. भौतिकशास्त्राचा एक सामान्य शिक्षक त्याच्या मुलीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील अस्वस्थ करणाऱ्या चुका बघतो, तेव्हा त्याचे जग कसे उलथेपालथे होते, याची कथा हा चित्रपट उलगडतो.
निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. विचारी आणि निश्चयी वडिलांच्या भूमिकेतला अभिनेता सुबोध भावे पोस्टरच्या केंद्रस्थानी आहे. इतिहासाचे ज्ञान आणि वजन या दोन्हींचे प्रतीक असणाऱ्या पुस्तकांच्या एका भल्यामोठ्या भिंतीच्या पार्श्वभूमीवर हात आवळलेल्या विचारमग्न स्थितीतील ही व्यक्तिरेखा दिसत आहे. त्याच्यासमोर गणवेशातील त्याची मुलगी आहे, ही मुलगी म्हणजे निरागसतेचे प्रतीक आहे तसेच इतिहासाची धारणाच पणाला लागलेल्या पुढील पिढीची प्रतिनिधी आहे. ‘ब्रेनवॉश्ड बाय हिस्टरी टेक्स्टबुक्स’ या टॅगलाइनमधून चित्रपटाचा मध्यवर्ती विषय अधोरेखित होतो.
दिग्दर्शक मनप्रीत सिंग धामी म्हणाले, “माझ्यासाठी हा केवळ चित्रपट नाही, हा माझ्या हृदयाच्या जवळचा प्रोजेक्ट आहे. मी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ याचसाठी जगत आहे, श्वास घेत आहे. या कथेच्या गाभ्याला आकार देण्यासाठी मी अनेक वर्षे संशोधन केले आहे, वाचन केले आहे, प्रश्नं विचारले आहेत. सखोल वैयक्तिक चौकसता आणि आपल्याला काय शिकवले जाते, आपण काय लक्षात ठेवतो आणि या कथनांनी समाजाचे सदस्य म्हणून आपली ओळख कशी तयार होते याबद्दल वाटणारी काळजी यांतून ही कथा खुलली आहे. आपल्यापुढे ठेवल्या गेलेल्या माहितीच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाची तार हा चित्रपट छेडेल असे मला वाटते. प्रेक्षकांना अर्थात जनतेला कधी एकदा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल असे मला खरोखरीच वाटत आहे. तसेच ते मनात प्रश्न घेऊन, एक दृष्टी घेऊन आणि नव्याने जागी झालेली चौकसता घेऊन चित्रपटगृहांमधून बाहेर पडतील, अशी आशाही मला वाटते.”
पंचकर्म फिल्म्सचे संस्थापक मनप्रीत सिंग धामी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात खिळवून ठेवणारी कथा, प्रभावी अभिनय आणि सध्याच्या सामाजिक वातावरणाशी जुळणारा काळाची गरज असलेला संदेश एकत्र आले आहेत. हिज स्टोरी ऑफ इतिहास हा केवळ एक चित्रपट नाही, तर शिक्षण, वारसा आणि कथनांमध्ये हमखास फेरफार केले जाणाऱ्या जगात सत्यासाठी दिलेला लढा यांबद्दलचे ठाम विधान आहे.