20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमनोरंजनगाडी नंबर १७६०चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

गाडी नंबर १७६०चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर

मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.”

निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, ” तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर १७६०’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.”

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!