मराठी चित्रपटसृष्टी मध्ये तब्बल ६० वर्ष सुरेल संगीत गायन करणारे पद्मभूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगभूमीवरील त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये श्रीनिवास खळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गायन कार्यक्रमास सुरवात झाली. पुणे नवरात्रौ महोत्सवात २००० साली श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती पुरस्कार देऊन श्रीनिवास खळे यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच त्यांनी त्यावेळी कार्यक्रम देखील सादर केला होता या आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्यात आला. तसेच त्यांच्याशी संबंधित गाणी देखील गाण्यात आली.
३१वा पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. पुणे नवरात्रौ मोहत्सवचे आयोजक अध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल आणि जयश्री बागुल यांनी या सुरेख सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर आर. जे. बंड्या याने आपल्या ओघवत्या शैलीने करत प्रेक्षकांना संपूर्ण कार्यक्रमात खिळवून ठेवले.

१९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अभिषेक सराफ, अक्षय घाणेकर कल्याणी घाणेकर, तन्वी दाते यांनी वेगवगेळया सुरेल गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. नामांकित गायक ए. आर. रहमान , कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल यांच्या विविध गाण्यांचा समावेश यामध्ये होता. प्रेक्षकांनी १९९० च्या दशकातील सुरेल गाणी पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त करत टाळ्या वाजवून तसेच आवडती गाणी गुणगुणत जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. ए. आर. रहमान यांचे “दिल से रे…” हे गाणे गायक अभिषेक घाणेकर यांनी उत्साहपूर्ण वातावरणात गातच प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद देत “वन्स मोअर” म्हणत गाणे पुन्हा गाण्यास लावले. श्रेया घोषल यांनी गायलेल्या ” जादू है नशा है” गाणे गायिका कल्याणी देशपांडे यांनी सुमधुर आवाजात गात उपस्थितांची मने जिंकली. गायक अक्षय घाणेकर आणि गायिका कल्याणी देशपांडे यांनी एकत्रित गायलेल्या सुप्रसिद्ध आशिकी चित्रपटातील गाण्याला तर प्रेक्षकांनी शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. बॉम्बे चित्रपटातील ए.आर.रहमान यांचे अजरामर गाणे “तू ही रे..तेरे बिना में कैसे जिऊ” गाण्यात तर प्रेक्षक ताल्लिन झाल्याचे पाहावयास मिळाले, गायका सोबत एकत्रित गाणे गात त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रथमच नवरात्रौ उत्सव मध्ये गायन करत असलेल्या तन्वी दाते हिच्या सुरेल गाण्यांनी देखील सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी नामांकित गायकांना संगीत वाद्य कलाकारांनी देखील उत्कृष्ट साथ दिली. ड्रम वादनअभिजित भदे, रिदम मशीनओंकार इंगवले, सॅक्सोफोनपीयुष तिवारी, पियानोशंतनु जहागिरदार आणि भारत ढोरे, गिटार वादन अजय थोरात तर तबला वादन मंगेश जोशी यांनी केले. यावेळी आबा बागुल, नंदकुमार कोंढालकर, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, सुनील महाजन, निकिता मोघे, विलास रत्नपारखी, ॲड. चंद्रशेखर पिंगळे, द.स.पोळेकर उपस्थित होते.