पुणे: आपला इतिहास आणि पराक्रम व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आहेत. हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती आहेत. रायगडावरील ते पहिले आणि एकमेव सरसेनापती आहेत. आपला इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आपल्या पूर्वजांना अति माननीय दाखवण्याची गरज नाही. हल्लीच्या काळात विविध माध्यमातून आपल्या इतिहासाविषयी आणि इतिहासातील पात्रांविषयी अतिशयोक्ती केली जात आहे, असे करणे टाळून इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे, असे मत इतिहास अभ्यासक विक्रमसिंह मोहिते यांनी व्यक्त केले.सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज रथ समितीच्या वतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार पेठेत करण्यात आले होते. यावेळी इतिहास अभ्यासक विक्रम सिंह मोहिते, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संस्थापक अमित गायकवाड, सागर पवार, शिरीष मोहिते, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. निता मोहिते, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अविनाश मोहिते, राष्ट्रवादी पुणे शहर सरचिटणीस गणेश मोहिते, ॲड. प्रशांत मोहिते, विजय मोहिते, राहुल मोहिते, संदिप मोहिते, महेश मोहिते, ब्रम्हा मोहिते, चारुदत्त मोहिते, नरेंद्र मोहिते, रोहन मोहिते,प्रमोद मोहिते, गणेश मोहिते उपस्थित होते.
शिरीष मोहिते म्हणाले, हंबीरराव मोहिते यांचे वंशज कसे असावेत, हे आपण कर्तृत्वाने दाखवून दिले पाहिजे. केवळ मोठेपणा न मिरवता आपल्या वंशज यांची साखळी तयार करून समाजासाठी काम केले पाहिजे.
अमित गायकवाड म्हणाले, अनेक इतिहासकारांनी आपल्या मनातील इतिहास लिहिला आहे. खरा इतिहास कळण्यासाठी आपण इतिहास वाचला पाहिजे. विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय मोहिते यांनी आभार मानले .