पुणे -: ‘एचएमपीव्ही’ हा विषाणू नवीन नाही. त्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तथापि, सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेन्द्र डुडी यांनी केले आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘एचएमपीव्ही’ विषाणूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ८) आढावा घेतला. बैठकीस ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामतीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यम्पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, तसेच सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.’एचएमपीव्ही’ विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, हा विषाणू २००१ पासून माहितीमध्ये आहे. तथापि, वैद्यकीय यंत्रणांनी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विषाणूबाबत कसे उपचार करता येतील यासाठी अवगत ( ओरीएंटेशन ) करावे. सर्व आरोग्य संस्थेमध्ये किमान पुढील तीन महिने पुरेल इतका पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. व्हेन्टींलेटर्स, ऑक्सिजन प्लँट तसेच अन्य साधनसामुग्री सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी. आवश्यक तेथे त्वरीत दुरुस्ती करुन घ्यावी. दैनंदिन आएलआय/सारी (एसएआरआय) सर्वेक्षण गुणवत्तापूर्ण व नियमित सुरु ठेवावे. दैनंदिन गृहभेटी मध्ये जनजागुती करावी. आवश्यकतेनुसार साबण व पाणी यांचा वापर करावा. सॅनेटायझरचा वापर करावा.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. यम्पल्ले यांनी आरोग्य विभागाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पुणे जिल्ह्यात यंत्रणा दक्ष असल्याचे सांगितले.