पुणे- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने दिनांक १६ जून रोजी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पुणे येथे संपन्न झाला.लोकमान्य सभागृह ,केसरी वाडा, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातून सुमारे १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. बारामती , शिरूर , भोर वेल्हा येथून देखील विद्यार्थी पालकांसोबत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले.”विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन केवळ नौकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करावा व आपल्या समाजबांधवांना रोजगार उपलब्ध करून द्यावा” असे उदगार राष्ट्रीय अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ गोविंद कुलकर्णी यांनी काढले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महासंघातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजातील ११ गरीब , होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले व भगवान परशुराम स्कॉलरशिप देण्यात आली.आगामी काळात विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक प्रवासात महासंघ कायम त्यांच्या सोबत असेल , त्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी , JEE , CET , NEET साठी तज्ज्ञांकडून सेमिनार , वेबिनार आयोजित करण्यात येतील अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी दिली व यानिमित्त पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी ची घोषणा करण्यात आली.कार्यक्रमाला 500 च्या वर पालक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या प्रा. उर्मिला दीक्षित यांनी मुलांना करिअर मार्गदर्शन केले व मुलांच्या मनातील शंकांचे निरसन केले. दरवर्षी प्रमाणे यंदाचा प्रतिभावंत युवा पुरस्कार , शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल श्री कुणाल शैलेश टिळक यांना प्रदान करण्यात आला. “अखिल भारतीय ब्राह्मण संघाचे ब्राह्मण समाजासाठी असलेले योगदान खूप मोठे आहे , गरीब मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी आपण उचललेले पाऊल समाजापुढे एका आदर्श निर्माण करते व या कार्यासाठी माझे सदैव योगदान असेल” असे गौरोवोद्गार त्यांनी आपल्या भाषणात केले व एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली , जिल्हाध्यक्ष (महिला आघाडी ) सौ केतकी कुलकर्णी यांनी महासंघाची माहिती दिली , सौ स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले , आभार अनिरुद्ध पळशीकर यांनी मानले. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.