मुंबई, – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पाणीपुरवठा मिळावा यासाठी आमदार शंकर जगताप यांनी ठाम भूमिका घेत मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करण्याची आग्रही मागणी केली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
बैठकीत महत्त्वाचे मुद्दे चर्चेला
आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या लेखी मागणीनुसार ही बैठक मंत्रालयात पार पडली. आमदार शंकर जगताप यांनी मुळशी धरणातून महानगरपालिकेसाठी पाणी आरक्षित करण्याची गरज अधोरेखित करत ठोस भूमिका मांडली. या वेळी आमदार महेश लांडगे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता दीपक पाटील
उपस्थित होते.
बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवडच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता, २०५१ पर्यंत होणाऱ्या वाढीव लोकसंख्येसाठी ८१४ एमएलडी पाण्याची गरज भासणार असल्याचे ठामपणे मांडले. सध्या महानगरपालिकेसाठी पवना धरणातून ५३० एमएलडी, आंद्रा धरण बंधाऱ्यातून ८० एमएलडी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) २० एमएलडी असे एकूण ६३० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. मात्र, लोकसंख्यावाढीचा वार्षिक ७% दर लक्षात घेता, भविष्यात ८१४ एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे मुळशी धरणातून ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली.
पाणीपुरवठ्यासाठी ऑडिट करण्याचे निर्देश
या मागणीवर उत्तर देताना जलसंपदा मंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाण्याच्या वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिकेने सादर केलेल्या डेटाची पडताळणी करण्यासाठी मुख्य जल परीक्षकांकडून ऑडिट करण्याचे आदेश दिले. तसेच, महानगरपालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करीत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. मुळशी धरणातील गाळ काढण्याचे आणि धरणाच्या देखभालीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
धरणातील पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याच्या सूचना
बैठकीत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेऊन सांडपाण्याच्या पुनर्वापरासंबंधी आणि महानगरपालिकेच्या पाण्याच्या स्रोतांचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच धरणातून आऊटलेटद्वारे बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आमदार शंकर जगताप यांचा ठाम आग्रह
बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाने नेमून दिलेल्या पाणी साठ्यापेक्षा महानगरपालिका अतिरिक्त पाणी वापरत नसल्याचेही अधोरेखित केले. मुळशी धरणातून महानगरपालिकेसाठी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय तातडीने व्हावा, अशी त्यांनी पुनरुच्चार करून मागणी लावून धरली.
जलसंपदा विभागाकडून पुढील कारवाई अपेक्षित
बैठकीच्या शेवटी मुळशी धरण व इतर धरणांतून पाणी आरक्षित करण्यासाठी उपाययोजना तपासून अहवाल सादर करण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली. शहराच्या विस्तारासोबतच गहुंजे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, मान, नेरे आणि सांगवडे या सात गावांचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची मागणी आणि तुटवडा लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील स्तरावर अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणार आहे.