पुणे:पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे अजित पवार की चंद्रकांतपाटील, पुण्याचा ‘दादा’ कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.2004 पासून अजितदादा पवार हे पुणे शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी सक्रीय आहेत. त्यांना जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांची प्रशासनावर मोठी पकड देखील आहे. त्यामुळे अजितदादांना पालकमंत्री करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे ( अजितदादा पवार ) जिल्ह्याध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली आहे.दुसरीकडे भाजप नेते, कार्यकर्तेही पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं दिसून येते. पुण्यात भाजपचे आमदारही मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकत्त्व भाजपकडे राहिल्यास कामे मार्गी लावण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, असं कार्यकर्त्यांना वाटते.याबद्दल विचारल्यावर कोथरूडचे आमदार, माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “तुम्ही अशा माणसाला विचारात आहात, ज्याला प्रश्नही तोच आणि उत्तरही तेच आहे. माझे श्रेष्ठी जे सांगतील ते मी करतो. कार्यकर्त्यांचं काय, तर नेता देखील आपल्याला अधिकाधिक चांगलं मिळावं, अशी इच्छा व्यक्त करतो. पण, आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात.”अनेक सहयोगी पक्ष सोबत घेऊन जायचं असते, तेव्हा नेहमीच समजूतदारपणा दाखवायचा असतो. भविष्यात काय दडलं आहे, याबद्दल मला माहिती नाही,” अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
दरम्यान, राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद चर्चेत आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांची बाजू भक्कम करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावत समस्या सोडविण्यासाठी, विकास प्रकल्पांचा गती देण्यासाठी जोर लावला.तर दुसरीकडे अजित पवार यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेऊन पुण्यातील विषयांना हात घातला वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गेले काही महिने भाजप आणि पवार यांच्यातील कुरघोड्या पहायला मिळत होत्या. पण, शेवटी अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्रिपद आपल्याकडे घेतले आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.