32.2 C
New Delhi
Saturday, March 7, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

पुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पशुसंवर्धन विभागाच्या यशोगाथा सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचवा; महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची आवश्यकता – उपसभापती डॉ. गोऱ्हे

पुणे.: पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ पशुवैद्य, तज्ज्ञ आणि प्रगतशील पशुपालकांचा सन्मान करण्यासाठी ‘ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र’च्या वतीने आयोजित गौरव पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील औंध येथे पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध श्रेणींमधील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रमेश वझरकर यांनी सांगितले की, २०११ मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वडील ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी संशोधक प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. वडिलांच्या या इच्छेनुसार डॉ. गोऱ्हे यांनी त्वरित आर्थिक मदत दिली आणि त्यातूनच ‘डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे पुरस्कृत उत्कृष्ट पशुवैज्ञानिक पुरस्कार’ सुरू झाला. यंदा हा पुरस्कार मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र जयवंत झेंडे यांना देण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, “माझ्या वडिलांनी BAIF संस्थेत तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ग्रामीण विकासासाठी अतुलनीय योगदान दिले. संकरित पैदास कार्यक्रम आणि पशुधनासाठी लस निर्मिती क्षेत्रात त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. फूट अँड माऊथ डिसीजवरील औषध शोधण्यात त्यांचा मोठा वाटा होता.”

परदेशातील पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता भारतातील पशुवैद्यकीय सेवेचे महत्त्व अधोरेखित करत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, परदेशात अपॉइंटमेंट मिळणे कठीण झाले आहे, तर भारतात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा चांगली आहे. पण या व्यवसायाला अजून पुरेसे महत्त्व मिळालेले नाही. शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार (SDG) पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पुरवणी मागण्यांमध्ये पशुसंवर्धन विभागासाठी बजेटमध्ये काय तरतुदी आहेत, यावर माझे विशेष लक्ष असून विभागाच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाने यशोगाथा आणि शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करत त्यांनी आगामी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने यंदाचे वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे होत असल्याचे सांगितले. महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा निधी दिला. तसेच वडिलांनी लिहिलेले ‘माझ्या जीवन लहरी’ हे पुस्तक डॉ. प्रविणकुमार देवरे यांना भेट दिले.

यंदाचे पुरस्कारप्राप्त मानकरी:

  • जीवनगौरव पुरस्कार: डॉ. लक्ष्मण सांडूजी वाणी
  • उत्कृष्ट पशुवैद्य: डॉ. सचिन वंजारी (सांगली), डॉ. पल्लवी कुरुंदकर (कोल्हापूर)
  • प्रगतशील पशुपालक: श्री. शिवानंद होनमोटे (सोलापूर – पशुपालन), श्री. सचिन लाखे (धाराशिव – कुक्कुटपालन), श्रीमती जयश्री गाढवे (पुणे – शेळीपालन), श्री. अमोल पवार (सातारा – मेषपालन)
  • कार्यक्रमात पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. श्री. मुकणे, डॉ रमेश वझरकर, श्रीमती जेहलम जोशी, श्रीमती रश्मी जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘दूध’ या विषयावरील स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. आभार उपाध्यक्ष डॉ. विवेक क्षीरसागर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
11 %
1.7kmh
0 %
Sat
33 °
Sun
38 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments