पुणे : ख-या विद्यार्थ्यांना कधीच सुटी नसते, सुटी ही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते, असे व. पु. काळे म्हणत असत. अशीच उन्हाळी सुटी संपून शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत पोलिसकाकांनी गुलाबाचे फूल आणि रेवडी देऊन पारंपरिक पद्धतीने केले. भारत माता की जय आणि गणपती बाप्पा मोरया… अशा घोषणांनी शुक्रवार पेठेतील पुणे महानगरपालिकेच्या शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक १ तसेच पद्मश्री डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, राष्ट्रीय खो-खो पटू मृणाल कारखानीस, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भरेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा नाईक, जयवंत बोरसे, प्रशालेचे शाळा प्रमुख दामोदर उंडे, लता टेकवडे, दत्तात्रय नाईक, प्रकल्प अधिकारी मनोरमा आवारे, मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, मंडळाचे शिरीष मोहिते, नितीन दिक्षित, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी संख्येची उदासिनता दिसून येत आहे. इंग्रजी भाषा गरजेची असली तरी देखील मराठी भाषा ही तितकीच महत्वाची आहे, याचे महत्व सांगण्यासाठी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता सेवा मित्र मंडळ दरवर्षी पुढाकार घेते.
डॉ. संदीप सिंह गिल म्हणाले, बौद्धिक क्षमतेसोबत शारीरिक क्षमतेचा विकास देखील तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यायामाकडे लक्ष द्यायला हवे. बौद्धिक, शारिरीक विकासासोबतच अध्यात्मिक विकास देखील गरजेचा आहे. त्याकरिता दररोज ध्यान-धारणा करुन मन शांत ठेवण्यास विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे. यातून अभ्यासाकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मनीषा केंजळे यांनी सूत्रसंचालन केले.