पुणे : आयुष्यात आपल्या गरजा कमी असतात; पण आपल्या दुसऱ्यांकडून अपेक्षा मात्र जास्त असतात. अन् त्यामुळे आपल्या वागण्या, बोलण्यात अहंकार येतो. मी पणा यायला सुरूवात होते. अन् त्यानंतर आपण समोरच्याला महत्व द्यायचे आपण कमी करतो. असे न करता आपण ध्यान, विपश्यना केली पाहिजे. स्वतःचा माणूस म्हणून शोध घेतला पाहिजे. बुद्धांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मार्गाने चाला. त्यामुळे आयुष्य अधिक सुकर आणि आनंदी होईल, असा उपदेश भन्ते थान (व्हिएतनाम संघ ) यांनी दिला.धम्मचक्र प्रवर्तन दिन व वर्षावास समारोप निमित्त सम्यक विहार व विकास केंद्र, बोपोडी येथे आयोजित कार्यक्रमात बौद्ध अनुयायांना उपदेश करताना भन्ते थान (व्हिएतनाम संघ) बोलत होते. पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनिता वाडेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर यांच्या वतीने आयोजित हा धम्म सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भन्ते बुद्धघोष मेत्ता थेरो, भन्ते धम्मानंद, भन्ते सचिन, भन्ते संघदुत, भन्ते यश आदि उपस्थित होते.यावेळी भन्ते बुद्धघोष मेत्ता थेरो यांनी वर्षावासाचे महत्व सांगितले, तसेच धम्म प्रसारासाठी उपासक, उपसिका यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.
परशुराम वाडेकर म्हणाले, मागील अनेक वर्षे वर्षावासा निमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत, प्रत्येकाचा मृत्यू हा अटळ आहे. हे सत्य आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. काल उद्योगपती रतन टाटा देशाची सेवा करता करता आपल्यातून निघून गेले. त्यामुळे मृत्यू नंतर आपलं काहीही नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. म्हणून आपण नेहमी बुद्धांच्या शिकवणी नुसार आचरण केले पाहिजे म्हणजे आपल्या सगळ्यांचं मंगल होईल. याप्रसंगी भिख्खू संघाला चिवरदान, अन्नदान आणि बौद्धाचार्य यांचा सन्मान करण्यात आला.सुनिता वाडेकर यांनी धम्म पालन गाथे ने कार्यक्रमाचा समारोप केला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कदम यांनी केले तर सचिन साळवे यांनी आभार मानले.