पिंपरी- -आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिले. पण, हेच पैलवान आत्ता भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकरिता भोसरीचे मैदान मारण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटना, पैलवान ग्रुपने आमदार लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. हे पैलवान लांडगे यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भोसरीचे मैदान पैलवान महेश लांडगे हेच मारणार, असा विश्वास पैलवानांनी व्यक्त केला.
कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच महेश लांडगे यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, एकदा अपक्ष आणि एकदा भाजपकडून असे दोनवेळा भोसरीचे आमदार झाल्यानंतर आता तिसऱ्यांदा भोसरीचे मैदान मारण्यासाठी आमदार लांडगे भोसरीच्या आखाड्यात उतरले आहेत. लांडगे यांच्यासाठी शहरातील पैलवानही मैदानात उतरणार आहेत.
दरम्यान, शहरातील पैलवानांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेने आणि पैलवान ग्रुपने आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उपाध्यक्ष विशाल कलाटे यांच्यासह आजी-माजी खेळाडू वस्ताद, कुस्ती प्रशिक्षक यावेळी उपस्थित होते. ‘बजरंग बली की जय’, ‘महेशदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणांनी पैलवानांनी परिसर दणाणून सोडला.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष विशाल कलाटे म्हणाले की, आमदार महेश लांडगे स्वतः पैलवान आहेत. त्यामुळे पैलवानांच्या समस्या त्यांना माहिती आहेत. ते पैलवानांच्या मदतीला नेहमी धावून येतात. पैलवानांने आवाज दिल्यास आमदार महेश लांडगे हजर असतात. पैलवानांचा आवाज म्हणून लांडगे काम करत आहेत. त्यांना शहरातील सर्व पैलवानांनी पाठिंबा दिला आहे. संघटनेचे १२५ हून अधिक पैलवान आमदार लांडगे यांच्या प्रचारात उतरणार आहेत. आजी-माजी खेळाडू, वस्ताद, कुस्ती प्रशिक्षक आमदार लांडगे यांच्या प्रचारत सक्रिय होणार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे.
खेळ आणि राजकारण हे खूप वेगळे आहे. कुस्ती हा माझा खेळ आहे. खेळातील कुस्तीनंतर पैलवानांच्या ताकदीवर राजकारणातील कुस्तीही मारणार आहे. पैलवानांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी माझे प्राधान्य असते. पिंपरी-चिंचवडमध्ये कुस्तीची परंपरा जुनी असून येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार झाले आहेत. हा पारंपरिक खेळ नव्या पिढीत रुजविण्यासाठी आणि या खेळात नवे मल्ल घडविण्याचे काम भोसरीतील कुस्ती संकुलातून होत आहे. कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेणार्या मुलांना कुस्तीचे विविध डाव शिकविले जातात. कुस्तीसाठी लागणारी चपळता, जलद हालचाली, डावपेचातील कसब, प्रतिस्पर्धी मल्लाला लक्ष्य करून कशा पद्धतीने चितपट करायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते. संकुलात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांतून ऑलिंपिक विजेते खेळाडू घडविण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.