पुणे -पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमधील खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे २०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६० ते ८० रुपयांना विक्रीस आहे. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरु केली आहे. मात्र टर्मिनलवर चहा, कॉफीचे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत.जुन्या टर्मिनलमध्ये एका स्टॉलवर कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध आहे. नवीन टर्मिनलवर मात्र एकाही स्टॉलवर कमी किमतीत पदार्थांची विक्री केली जात नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरुन प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता कमी दरात चहा, कॉफी व पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे.यासाठी एक स्टॉल राखीव ठेवण्यात येणार आहे. यातील पदार्थांचे दर टर्मिनलमधील अन्य स्टॉलच्या तुलनेत अत्यंत कमी असणार आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
विमानतळ प्रशासन नवीन टर्मिनलवर चहा व पाण्याची बाटली २० रुपयांना देण्याच्या विचारात आहे. यासाठी एक छोटा स्टॉल सुरू होणार आहे. सध्या नवीन टर्मिनलवर १२० विमानांची वाहतूक होते. काही दिवसांत ती वाढणार आहे. त्यामुळे १० ते १५ दिवसांत नवीन स्टॉल प्रवाशांसाठी उपलब्ध होण्याची आशा आहे.
गेल्या आठवड्यात देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कोलकता विमानतळावर एक चहा ३४० रुपयांना घेतला असल्याची पोस्ट केली होती. चहाच्या दरावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांची एक्सवरील पोस्ट समाज माध्यमांत खूप व्हायरल झाली. परिणामी या प्रकाराची चौकशी करणार असल्याचे कोलकता विमानतळ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.