पुणे ; हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या 119 व्या पुण्यतिथी निमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
गत वर्षीपासून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून या शालेय साहित्य वाटप उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावर्षी भोर आणि वेल्हे तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती (विंझर), कातकर वस्ती (विंझर), लिंबरवाडी (पाबे) आणि जोगवाडी (भोर) या शाळांमधील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर, प्रत्येकी सहा वह्या, दोन पेन्सिल बॉक्स, जेवणाचा डब्बा, पाणी बॉटल, सँडल तसेच इतर आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. याशिवाय जोगवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुरविण्यात येणार आहे.
————–..
कोट
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात करून ब्रिटीश साम्राज्याविरोधात समाज एकत्र काम करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. याच चळवळीतून पुढं देशाला स्वातंत्र मिळालं. अशा या क्रांतिकारकाच्या पुण्यतिथीनिमित्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी यासाठी शैक्षणिक साहित्य उपक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यातून गरजू विद्यार्थ्यांना मदत होऊन त्यांचं उज्वल भवितव्य घडेल असा विश्वास आहे.’’
– पुनीत बालन, उत्सवप्रमुख व विश्वस्त