तळेगाव दाभाडे,: येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने येत्या ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, यंदा समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे. व्याख्यानमालेचे हे २३ वे वर्ष आहे.
हे कीर्तन सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालयाच्या शेजारी, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे होणार आहे. सावा हेल्थकेअरचे चेअरमन विनोद रामचंद्र जाधव हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तर वडगाव मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गणेश ढोरे अध्यक्षस्थानी असणार आहेत. श्रोत्यांनी व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व सचिव डॉ. वर्षा वाढोकर यांनी केले आहे.
आमदार सुनील शेळके यांचा भव्य नागरी सत्कार :
आमदार सुनील शेळके यांचा मावळ विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय झाल्याबद्दल सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.