पुणे, – पुरातत्व आणि प्राचीन दस्ताऐवजांचे महत्व लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या वतीने भांडारकर संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवत सर्वतोपरी सहकार्य आणि आर्थिक सहयोग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यसभा खासदार आणि शिक्षण, महिला, बालक, युवा आणि क्रीडा संबंधीच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंग यांनी आज येथे सांगितले.
या समितीचे सदस्य असलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाने आज भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. या शिष्टमंडळात राज्यसभेचे सदस्य सर्वश्री सिकंदर कुमार, भीम सिंह, घनश्याम तिवारी, श्रीमती सुनेत्रा पवार आणि स्वाती मालीवाल, तसेच लोकसभेचे सदस्य असणारे सर्वश्री दर्शनसिंह चौधरी, जितेंद्रकुमार दोहरे, हेमांग जोशी असे उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया, सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, विश्वस्त प्रदीप रावत, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, नियामक मंडळाचे सदस्य प्रदीप आपटे, मनोज एरंडे, श्रीनिवास कुलकर्णी, मंदार जोग आदींनी केले.

भांडारकर संस्थेच्या कार्याची प्रशंसा करतांना दिग्विजय सिंग पुढे म्हणाले की, शतकोत्तर कार्य करणाऱ्या भांडारकर संस्थेमध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप कधीही होऊ नये व स्वायत्तता अबाधित रहावी अशी अपेक्षा आहे. संस्थेने दुर्मिळ असे प्राचीन दस्तावेज, हस्तलिखिते जतन केली आहेत, ज्याचा संपूर्ण जगाला उपयोग होऊ शकतो. इतिहासाची योग्य आणि सत्य मांडणी करण्यासाठी संस्थेने अधिक कार्य करावे, ज्यासाठी केंद्र सरकार चांगला निधी उपलब्ध करुन देईल, असा प्रयत्न करण्यात येईल. संस्थेचे संस्थापक डॉ. भांडारकर आणि भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अद्वितीय कार्यास प्रणाम करायला हवा.संस्थेच्या वतीने यावेळी सर्व सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेकडे असलेली दुर्मिळ हस्तलिखिते, संस्थेची प्रकाशने, ग्रंथालय, भारतविद्या हा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समवसरण या खुल्या सभागृहाची (ॲम्फी थिएटर) पाहणी केली. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनन्द बापट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.


