26.5 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रकोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

कोल्हापूर : विजयादशमी निमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात पार पडला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीरवासीयांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा साजरा झाला.

राजेशाही थाट आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम

कोल्हापूरच्या शाही दसरा उत्सवाला प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त असून, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांनी शहरात उत्साहाचे वातावरण होते. असुरांचा संहार करून भक्तांना अभय देणाऱ्या दुर्गेच्या नवरात्रोत्सवाची सांगता या शाही दसरा सोहळ्याने होते. विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि शाही थाटात पार पडला. करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्यांसह भालदार, चोपदार, घोडेस्वार आणि शाही लवाजम्यासह झालेली मिरवणूक कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली. या मिरवणुकीदरम्यान मार्गावर दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला.

राजघराण्याची उपस्थिती आणि शाही सलामी

सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून गाड्यांच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून खासदार शाहू महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार युवराज मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजे यांचे दसरा चौकात आगमन झाले. उपस्थित करवीरवासीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. भालदारांनी ललकारी देत सलामी दिली, तर पोलिस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे मानगीत गायले गेले. यानंतर सरदार आणि मानकऱ्यांचे मुजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले. पांढऱ्या रंगाच्या भव्य शामियानात सरदार, मनसबदार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

शमी पूजन आणि सोने लुटण्याचा उत्साह

दसरा महोत्सव समितीच्यावतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत झाल्यानंतर राजपुरोहित यांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून अंबाबाईला सलामी देण्यात आली. सोने लुटण्याचा कार्यक्रम हा या सोहळ्याचा कळस ठरला. यावेळी करवीरवासीयांची अक्षरशः झुंबड उडाली. लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छा देत हा उत्सव उत्साहात साजरा झाला.

मान्यवरांची उपस्थिती

या शाही सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण, प्रशासन, नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.5 ° C
26.5 °
26.5 °
61 %
2.1kmh
0 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!