पिंपरी, – – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू तसेच निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, मुख्य अभियंता तथा मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता तथा समन्वय अधिकारी हरविंदरसिंह बन्सल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल शिंदे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन नगरे तसेच संबंधित कक्षांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध तयारीबाबत सविस्तर माहिती मुख्य निवडणूक निरीक्षक यांना दिली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेला प्रशिक्षण कक्ष, मतमोजणी कक्षांची मांडणी, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणेची माहिती देण्यात आली.
मतमोजणी प्रक्रियेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना अभिरक्षा कक्षाची रचना, तेथे ठेवण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे, अभिरक्षा कक्ष परिसरातील सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त तसेच सीसीटीव्ही निरीक्षण व्यवस्था यांचा आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू यांनी यावेळी घेतला.
याशिवाय मतमोजणीच्या दिवशी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेचा सविस्तर आराखडा, मतमोजणी टेबलांची संख्या, अधिकारी व कर्मचारी नेमणूक, प्रवेश व निर्गमन मार्ग, माध्यम प्रतिनिधी व उमेदवार प्रतिनिधींसाठी करण्यात आलेली व्यवस्था याबाबतची माहिती देखील त्यांना देण्यात आली.
दरम्यान, मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू यांनी यावेळी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक, सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीची पाहणी करून संबंधित कक्षांची प्रत्यक्ष तपासणी केली


