शतकोत्तर रौप्य महोत्सवात तुळशीबाग मंडळाचा भव्य देखावा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : मानाचा चौथा गणपती म्हणून ओळख असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यंदा आपला शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५ वा वर्ष) साजरा करत असून, या विशेष वर्षात गणेशोत्सवात ‘मथुरेतील वृंदावन’ साकारण्यात येत आहे. या भव्य देखाव्याचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
या वेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ दहा दिवसांचा उत्सव नाही, तर वर्षभर चालणारी विधायक चळवळ आहे. सार्वजनिक स्वरूपातील विविध उपक्रमांची या मंडळांनी परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, याची दखल घेतली जात नाही. एखादी नकारात्मक घटना झाली की ती लगेच गाजते, पण असे सकारात्मक कार्य दुर्लक्षित राहते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना सामाजिक एकोपा वाढवण्याचा उद्देश ठेवला होता, तो आजही अनेक मंडळांमुळे जिवंत आहे.”
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट हे १९५२ पासून धार्मिक आणि पौराणिक देखाव्यांच्या सादरीकरणाची परंपरा जपत आले आहे. मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले की, “यंदाचा ‘मथुरेतील वृंदावन’ हा देखावा विशेष भव्य आणि कलात्मक असेल. तब्बल ८० फूट रुंद, १२० फूट लांब आणि ३५ फूट उंच असलेल्या या देखाव्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराचे १४ पॅनल आणि सुमारे ३० मोर सजलेले असतील. राधाकृष्ण मंदिराचे २० फूट लांब व ४० फूट उंच भव्य प्रवेशद्वार हे या देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.”
या देखाव्याची निर्मिती सरपाले बंधू करत असून, हे संपूर्ण मंडप व देखावा पौराणिक वातावरण, भक्तीभाव आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम असणार आहे. तुळशीबाग गणपतीची मूर्ती, मंडळाचा इतिहास आणि सामाजिक उपक्रम यामुळे पुणेकरांसह पर्यटकांमध्येही या मंडळाला विशेष महत्त्व आहे.