पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित सेतू प्रकल्पाच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ब्रँड डिझाइन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्रज्ज्वल जयसिंग दिंडे यांनी, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोहित राजेंद्र घोडके यांनी, आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अमोल सोनू दर्डी व शौर्य भारद्वाज यांनी मिळवले आहे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना समान गुण मिळाल्याने परीक्षकांनी दोघांनाही पारितोषिकाची संपूर्ण बक्षीस रक्कम देण्याची शिफारस केली आहे. तसेच विशेष ज्यूरी पारितोषिक नासीर मेहबूब शेख यांनी पटकावले आहे.
‘हरित सेतू’ उपक्रमामार्फत महापालिका पादचारी केंद्रित रस्ते, सुसंगत पार्किंग व्यवस्था, मजबूत सार्वजनिक वाहतूक प्रणाली आणि सुरक्षित चौक यावर भर देत आहे. ही संकल्पना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षम, समावेशक आणि शाश्वत वाहतूक प्रणालीच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने विशेष ब्रँड डिझाईन स्पर्धा आयोजित केली होती.
देशभरातील सर्व डिझायनर्ससाठी खुली असणाऱ्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. डिझाईन, संकल्पना, मांडणी आणि सादरीकरण या विविध निकषांवर आधारित स्पर्धेचे परीक्षण असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ सदस्य, महापालिका अधिकारी, हरित सेतू प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञ व व्यावसायिक डिझायनर्सच्या परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले. त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
एका विजेत्याचे डिझाईन ब्रँड म्हणून वापरण्यात येणार
स्पर्धेतील विजेत्यांपैकी एका विजेत्याचे डिझाईन हे हरित सेतू प्रकल्पाचे ब्रँड डिझाईन म्हणून वापरले जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने हे डिझाईन वापरले जाणार आहे. विजेत्यांना याबाबत ई-मेलद्वारे माहितीही देण्यात आली आहे. तसेच अंतिम निवड झालेल्या डिझाईनचे हक्क डिझायनर व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडे संयुक्तपणे असणार आहेत.
ब्रँड डिझाईन स्पर्धेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांच्या भावना प्रतिबिंबित करणारी, लोकाभिमुख ब्रँड ओळख तयार करण्याचा आमचा प्रयत्न होता. ही स्पर्धा पारदर्शक व निष्पक्ष तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडली आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका