बहुआयामी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य दुर्लक्षित : योगेश सोमण
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देवत्व देऊन केवळ देव्हाऱ्यात न बसविता त्यांच्या हिंदुत्वाच्या मांडणीचा अभ्यास होणे तसेच त्यांच्या कार्यातून प्रभावित होऊन ते समाजापुढे आणण्याचे कार्य व्यापक स्तरावर होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक योगेश सोमण यांनी केले. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिपुष्प २०२६चे प्रकाशन खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी योगेश सोमण बोलत होते. लोकमान्य टिळक यांचे वंशज, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, अतुल रेणाविकर, पुणे शहर अध्यक्ष विक्रम दिवाण, अश्विनी कुलकर्णी आदी मंचावर होते. लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे आज (दि. २६) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
योगेश सोमण पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी बहरलेले होते. त्यांचे कार्य उत्तुंग हिमालयासारखे आहे. अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेव्यतिरिक्त एक क्रांतिकारक म्हणून त्यांनी निर्माण केलेला इतिहास दुर्लक्षित राहिला आहे. तो समाजापुढे मांडण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिपुष्प २०२६ या दिनदर्शिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा फक्त गौरव केलेला नसून त्यांच्या कार्याविषयीची सत्यता समाजापुढे मांडण्यात आली आहे.
केवळ शाब्दीक निष्ठा उपयोगाची नाही : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी..
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी निष्ठा असणाऱ्या महनीय व्यक्तींचा परिचय या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घडत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या प्रमाणित मराठी भाषेच्या वापराचा धरलेला आग्रह महत्त्वाचा असून त्यातील बारकावे शोधले जाणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असला तरी जागतिकिरणाच्या रेट्यात आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे, अशा वेळी प्रमाणित, लिखित मराठी भाषेचा आग्रह धरणे गरजेचे आहे. या करिता फक्त शाब्दिक निष्ठा उपयोगाची नाही तर कृतीतून कार्यात सहभाग असणे अपेक्षित आहे.
कुणाल टिळक म्हणाले, मराठी भाषेविषयी जवळीक आणि जपणूक मान्य असली तरी येणाऱ्या पिढीला सावरकर, टिळक आदींचे हिंदुत्ववादी विचार पोहोचविताना त्यांचे कार्य सर्व भाषांमधून, सोप्या मांडणीद्वारे समाजापुढे जाणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर दिनदर्शिका विविध भाषांमध्ये यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रविण तरडे यांचा शुभेच्छा संदेश ऐकविण्यात आला.
श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार घरोघरी पोहोचवावेत आणि रुजवावेत या संकल्पनेतून दिनदर्शिकेची दरवर्षी निर्मिती करण्यात येत आहे. सावरकर आणि त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्य चळवळीत केलेले कार्य करोडो भारतीयांपर्यंत पाहोचवावेत असा मानस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला निष्ठेने वाहून घेणाऱ्या महनीय व्यक्तींविषयी क्रांतिपुष्प दिनदर्शिका २०२६ यातून माहिती देण्यात आली आहे.
दीपप्रज्वलन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेली आरती आणि शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सागर बर्वे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. तर मान्यवरांचा परिचय समाजमाध्यम प्रमुख सौरभ दुराफे यांनी करून दिला. स्वागत सतिश काळे,अजित कुलकर्णी, अतुल रेणावीकर, निशिगंधा आठल्ये, अश्विनी कुलकर्णी, नेहा गाडगीळ, विदुला कुलकर्णी यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील 60 कुटुंबीयांना महिनाभर पुरेल एवढा किराणा व जीवनावश्यक वस्तू गिरीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने संस्थेतर्फे पुरवण्यात आल्या. या कार्याकरिता त्यांचा सत्कार करण्यात आला.
तनुश्री सोहनी यांची पुणे शहर महिला आघाडी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. आभार विक्रम दिवाण यांनी मानले.


