पुणे : “मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी खर्च करायचा, ही जुनी मानसिकता बदलली पाहिजे. मुलींच्या शिक्षणावर भर दिल्यास त्या स्वावलंबी होतील आणि महिलांवरील अत्याचार आपोआप कमी होतील,” असे मत समाजसेविका अंजली दमानिया यांनी व्यक्त केले. बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘आज स्त्री कितपत सुरक्षित आणि सबल – मुक्त असो की उंबऱ्या आड’ या चर्चासत्रात महिलांच्या सुरक्षितता, सबलीकरण आणि सामाजिक मानसिकतेवर सखोल चर्चा झाली.
या चर्चासत्रात अंजली दमानिया, अभिनेत्री दीपाली सय्यद, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सहभागी झाल्या होत्या. निवेदक नम्रता वागळे यांनी संवाद साधला. चर्चेत वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, धनंजय मुंडे लग्न प्रकरण यांसारख्या सामाजिक घडामोडींवरही चर्चा झाली.
महिलांनी महिलांसाठी एकत्र येणे गरजेचे
तृप्ती देसाई यांनी सांगितले, “महिलांवरील अत्याचाराविरोधात महिलांनीच एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. महिलांनी महिलांच्या विरोधात न जाता, एकमेकांना साथ दिली पाहिजे. निर्णय घेणाऱ्या ठिकाणी महिलांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, अनेकदा महिलांना विरोध करणाऱ्या देखील महिला असतात, त्यामुळे निर्णय पुरुषांकडे जातात आणि महिलांना न्याय मिळत नाही.”
मानसिकता बदलण्याची गरज
अंजली दमानिया म्हणाल्या, “प्रत्येक घरात मुलींना स्वयंपाक शिकवला जातो, तर मुलांना अभ्यासावर भर दिला जातो. ही मानसिकता बदलायला हवी. मुलगी कुठेही कमी नाही, हे घरातील महिलांनी सर्वात आधी स्वीकारायला हवे. दोघांनाही समान संधी दिल्यास मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.”
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याचे ज्ञान महत्त्वाचे
दीपाली सय्यद यांनी सांगितले, “महिलांना नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे आणि प्रत्येक क्षेत्रात असुरक्षितता भेडसावत असते. मात्र, सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलींना लहानपणापासूनच महिलां विषयक कायद्यांचे ज्ञान दिल्यास त्या अधिक सजग आणि सुरक्षित राहू शकतात.”
या चर्चासत्रातून महिलां विषयक मानसिकता बदलण्याची सुरुवात महिलांनीच करावी, महिलांनी एकत्र येऊन अत्याचाराविरोधात आवाज उठवावा, आणि मुलींना शिक्षण, कायद्याचे ज्ञान आणि स्वावलंबनाची संधी द्यावी, असा ठाम संदेश देण्यात आला.
बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या सबलीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे, हा या चर्चासत्राचा मुख्य निष्कर्ष होता.