वाल्हेकरवाडी : परंपरा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम घडवणारा भव्य नवरात्र महोत्सव आणि रास दांडिया स्पर्धा वाल्हेकरवाडी (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथे जल्लोषात संपन्न झाला. दिनांक २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भरविण्यात आलेल्या या महोत्सवाने परिसरातील नागरिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
या सोहळ्यात ११ लाख ११ हजार १११ रुपयांची पारितोषिके हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आली. विशेष आकर्षण ठरलेली रास दांडिया स्पर्धा, ज्यामध्ये विजेत्यांना तीन ई-बाईक, तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे, साड्या, गिफ्ट बॉक्स आणि लहान मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती जयश्री राजेंद्र खैरे आणि समस्थ वाल्हेकरवाडी ग्रामस्थ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. आयोजक मा. श्री. भरत वाल्हेकर आणि सौ. सुप्रिया भरत वाल्हेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

या वेळी प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी भरत वाल्हेकर यांचा सत्कार करण्याची मागणी केली असता त्यांनी विनम्रतेने सांगितले की, “सत्कार माझा नाही, आपल्या सर्वांच्या एकतेचा आहे; निवडणुकीनंतर तुम्ही तो करा!” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित नागरिकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
भरत आणि सुप्रिया वाल्हेकर यांनी गेल्या १२ दिवसांच्या उत्कृष्ट नियोजनातून महिलांना आणि तरुणांना नवरात्राच्या पारंपरिक रंगतदार दांडियाचा मंच उपलब्ध करून दिला. त्यामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिक सोहळा न राहता एकात्मतेचा आणि जनविश्वासाचा प्रतीक ठरला.
सदर नवरात्र महोत्सव आणि बक्षीस वितरण समारंभात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीची चाहूल लागल्याचे नागरिकांमध्ये चर्चेत होते. प्रभाग १७ मध्ये भरत व सुप्रिया वाल्हेकर यांच्या कार्यामुळे विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना गुलाब वाल्हेकर, वैशाली सुनील वाल्हेकर, आकाश राजेंद्र खैरे, शुभम सुनील वाल्हेकर, यश गुलाब वाल्हेकर, चंद्रकांत दत्तोबा चिंचवडे, गुलाब शंकर वाल्हेकर, प्रजाक्ता हेमंत वाल्हेकर आणि वाल्हेकरवाडी ग्रामस्थ तसेच प्रभाग १७ मधील नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले.
महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या १२ दिवसात या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या भरत आणि सुप्रिया वाल्हेकर यांच्या पाठिशी आम्ही कायम उभ्या राहू, तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून देऊ.”
गतवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने नागरिक आणि स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमात कोणतीही राजकीय रंगत नव्हती, परंतु जनतेच्या प्रेमाने तो अविस्मरणीय ठरला.
एकूणच, वाल्हेकरवाडीचा नवरात्र महोत्सव हा केवळ नृत्य-उत्सव नव्हे, तर ग्रामएकता, परंपरा आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक ठरला आहे.