25.7 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रदेहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध‌’

देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध‌’

मासिक धर्माचे महत्त्व विशद करित विद्यार्थिनींचा रिंगण सोहळा

पुणे : ‌‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल‌’, ‌‘सब महिला संतन की जय‌’ असा नामघोष आणि स्त्री संतांच्या अभंगांचा गजर करून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी मासिक धर्माचे महत्त्व विशद करित अनोखा रिंगण सोहळा साजरा केला.

निमित्त होते साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमाचे. नारायण पेठेतील एसएनडीटी कन्याशाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. रुपाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थिनींच्या गळ्यात पुष्पमाला घालून रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली. या अनोख्या रिंगण सोहळ्यात टाळ, झेंडे, अब्दागिरी, संतांची छायाचित्रे घेऊन विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होता. शाळा, महाविद्यालयातील शिक्षिका तसेच  गणेश मंडळाच्या सदस्यांचा यात विशेषत्वाने सहभाग होता.

प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना विशद करताना पियूष शहा म्हणाले, महिला संतांनी भक्तीपरंपरेत आणि मराठी साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजाला समता, भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश मिळाला आहे. हा संदेश पुढील पिढीपर्यंत जावा या उद्देशाने या अनोख्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. देहाचा विटाळ बाजूला सारून महिलांच्या मासिक धर्माविषयी जागृती करणारा हा पहिलाच रिंगण सोहळा आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

‌‘देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध‌’, ‌‘स्त्री जन्म म्हणोनी न होई उदास‌’ हे संत सोयराबाई आणि संत जनाबाई यांचे अभंग गात रिंगण सोहळा साजरा करण्यात आला. या रिंगण सोहळ्यात ‌‘छकुली‌’ नावाची घोडी सहभागी झाली होती. ‌‘वीर कन्यका, शूर कन्यका भारत मातेच्या; आम्ही मुली, आम्ही मुली कन्या शाळेच्या‌’, ‌‘हर्ष हर्ष जय जय‌’ अशा जोशपूर्ण घोषणाही विद्यार्थिनींनी दिल्या.

प्रा. डॉ. रुपाली शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्राला स्त्री संतांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. संत मुक्ताबाई, बहिणाबाई, सोयराबाई, जनाबाई, निर्मळाबाई यांनी अतिशय कष्टाने, समाजाचा विरोध पत्करून विठ्ठलाची भक्ती केली. त्यांच्या कार्याने आजच्या महिला घराबाहेरील जगात न घाबरता वावरायला शिकल्या आहेत. या स्त्री संतांनी प्रतिकूलतेशी संघर्ष करत अडचणींवर मात केली. ज्या काळी धर्मपरंपरेत स्त्री म्हणून भक्ती करण्याचाही अधिकार नव्हता त्या काळात मासिक धर्माच्या अपवित्रतेच्या समजुतीवर टीका करत अभंगही रचले आहेत.

एसएनडीटी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया कोथळीकर, विजयश्री महाडिक, सुनिता उबाळे यांच्यासह साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, रुचिका वरंदानी,  प्रवचनकार  स्मिता जोशी, गंधाली शहा, कोमल आण्वेकर, नंदू ओव्हाळ, रुत्विक आदमुलवार, गोविंदा वरदानी, कुमार आण्वेकर यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.7 ° C
25.7 °
25.7 °
87 %
4kmh
100 %
Mon
30 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!