पिंपरी, – : पिंपरी चिंचवड शहर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर तसेच फुटपाथवर दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत झाडांच्या संरक्षणासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने झाडांची नियमित देखभाल, निगा व जिओ-फेन्सिंगसह विविध उपाययोजना कशा पद्धतीने करण्यात येत आहेत, याचा आढावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घेतला.

क, फ, ब आणि ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक व फुटपाथवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची प्रत्यक्ष पाहणी अतिरिक्त आयुक्तांनी केली. देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा हाती घेतलेल्या उपक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही, याचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे, उद्यान निरीक्षक दादा गोरड, सहाय्यक उद्यान निरीक्षक ज्ञानोबा कांबळे, उद्यान सहाय्यक प्रदीप गजरमल यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी नेहरूनगर, संतोषी माता चौक ते यशवंत नगर चौक, टेल्को रोड, स्पाईन रोड, दत्तु तात्या चिंचवडे चौक, वाल्हेकर वाडी – ८० फुटी रस्ता, बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड, काळेवाडी बीआरटी रोड, कावेरी नगर, कसपटे वस्ती, वाकड परिसरातील प्रमुख रस्ते अशा विविध भागांची पाहणी करत झाडांच्या देखरेखीबाबत व निगेबाबत विविध निर्देश दिले.

रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावताना दोन झाडांच्या मध्ये नियमापेक्षा जास्त गॅप ठेवू नये, झाडांची कटिंग एका रेषेत करावी, झाडांभोवती प्लास्टिक वा कचरा दिसणार नाही याची काळजी घ्यावी, झाडांच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना बांबू ट्री गार्ड लावावे, झाडांना नियमित पाणी द्यावे, झाडांच्या मध्ये ‘तन’ राहू नये, फांद्यांची छाटणी नियोजनबद्ध असावी, अशा सूचना देतानाच रस्त्याच्या कडेला असणारे आयलंड्स स्वच्छ करून त्यांनाही हरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रस्ता दुभाजक व फुटपाथवर झालेल्या वृक्षारोपणाचा दर्जा, झाडांची संख्या आणि जिओ-फेन्सिंग याबाबत त्यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी वारंवार सूचना देऊनही निर्देशांचे पालन न करणाऱ्या व कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने या कामाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या देशी प्रजातींच्या वृक्षारोपण मोहिमेमुळे शहराच्या हरित आच्छादनात वाढ होईल, प्रदूषण नियंत्रणात राहील व पर्यावरणस्नेही शहरनिर्मितीस मदत होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केला.
……
शहीद अशोक कामटे उद्यानाला दिली भेट
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी वाकड परिसरातील शहीद अशोक कामटे उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्यानातील खुले व्यासपीठ, सुरक्षाव्यवस्था, स्वच्छतागृह आदींबाबत माहिती घेतली. येथील झाडांवर नियमित फवारणी करावी, झाडांना नियमित पाणी द्यावे, उद्यानात आवश्यकतेनुसार आणखी विद्युत दिवे बसवण्यात यावेत, अशा विविध सूचनाही त्यांनी दिल्या.