पिंपरी, – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी २०२६ रोजी या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडले. तीन टप्प्यात पार पडलेल्या या प्रशिक्षण सत्रास अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, निवडणूक निर्णय अधिकारी हणुमंत पाटील, दिप्ती सुर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र कुलकर्णी, प्रविण ढमाले, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य प्रशिक्षक नरेंद्र बंड, रामेश्वर पवार, शिवाजी लाटे तसेच मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर रुजू होण्याआधी मतदान प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि इतर कर्मचारी मतदान केंद्रांवर नियुक्त झाल्यानंतर त्यांना सर्व अधिकार प्राप्त झालेले असणार आहे, त्यामुळे या प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊन नये म्हणून प्रशिक्षणादरम्यान सर्व शंकांचे निरसण करून घ्यावे आणि वेळोवेळी आयोजित केले जाणाऱ्या प्रशिक्षण सत्रांना उपस्थित रहावे, असा सूचना अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.
या प्रशिक्षण कार्यक्रमात विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व अधोरेखित केले. मतदानाच्या दिवशी कामकाजात कोणताही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडथळा येऊ नये, यासाठी प्रशिक्षणादरम्यानच सर्व शंकांचे निरसन करून घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून जबाबदारीने काम करावे आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हातभार लावावा असे सांगितले.
प्रशिक्षणात संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत, निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी मतदारांसाठी टपाली मतदान, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी, मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची उभारणी, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान यंत्रांची जोडणी, मॉक पोल, मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही आदी बाबींचा समावेश होता.
याशिवाय, मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याबाबत देखील माहिती विषद करण्यात आली. तसेच मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परीसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही आदी बाबींची माहिती देखील उपस्थितांना देण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हाताळण्याबाबत सविस्तर प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. यामध्ये रामेश्वर पवार, नरेद्र बंड, किशोर शिंदे, आनंदकर यांनी प्रशिक्षण दिले.


