पिंपरी, – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. तर अंतिम दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत उमेदवार नामनिर्देशन पत्रे घेऊन जाऊ शकतात. यासाठी प्रत्येक कार्यालयात आवश्यक प्रशासकीय यंत्रणा, कर्मचारी तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून उमेदवारी माघारीसाठी २ जानेवारी २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशन पत्रांची छाननी, वैधता तपासणी, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्याचे सर्व टप्पे निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार राबविण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी नामनिर्देशन प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
याशिवाय, नामनिर्देशन पत्रे दाखल करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे तसेच अनिवार्य शुल्क वेळेत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असून, कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित नामनिर्देशन बाद होऊ शकते, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.


