पुणे : सवलतीच्या दरात मिळकत कर भरण्याचा ३० जून हा शेवटचा दिवस असल्याने पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या कर भरणा केंद्रांवर गर्दी केली. मात्र, महापालिकेच्या सर्व्हरवर ताण आल्याने दिवसभर प्रणाली डाऊन झाली होती. त्यामुळे कर भरायला आलेल्या नागरिकांना ३ ते ४ तास रांगेत उभे राहूनही कर भरता आला नाही, अशी तक्रार अनेकांनी केली.
नागरिकांच्या वाढत्या मागणीनंतर महापालिका आयुक्तांनी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ जाहीर केली असून, सवलतीसह मिळकत कर भरण्याची संधी आणखी सात दिवस मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करभरणा केंद्रांवर गर्दी, ऑनलाइन प्रणाली ठप्प
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात ३२५० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मे महिन्यापासून पाच ते दहा टक्के सवलतीसह कर वसुली सुरू होती. ३० जून ही अंतिम तारीख असल्याने नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्रे आणि ऑनलाइन पोर्टल यावरून कर भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्ग बंद पडले. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रांवर रांगा लागल्या आणि नागरिकांची गैरसोय झाली.
महसूलात १२४५ कोटींची भर
मिळकत कर विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, “१ मे ते ३० जूनदरम्यान सवलतीचा लाभ घेणाऱ्या तब्बल ७ लाख १० हजार नागरिकांनी मिळकत कर भरला असून, यामुळे सुमारे १२४५ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शेवटच्या दिवशी कर भरण्यास सुरुवात केल्याने सर्व्हरवर ताण आला. त्यामुळे नागरिकांना झालेल्या गैरसोयीची दखल घेत, ७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नागरिक ऑनलाइन व नागरी सुविधा केंद्रांवर कर भरू शकतात.”