पुणे :
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील प्रचाराचा नारळ फोडत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर थेट नाव न घेता टोलेबाजी केली. “भाजपवर टीका करण्याची आम्हाला गरज नाही, ते काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार करत आहेत,” असे म्हणत सामंत यांनी सूचक टीका केली.
उदय सामंत म्हणाले की, शिवसेना ही विकासाच्या मुद्द्यांवर बोलणारा पक्ष आहे. त्यामुळे इतर पक्षांवर टीका करण्यात शिवसेना वेळ घालवत नाही. पुण्यात सध्या ‘शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी लढाई सुरू असून, समोर मोठी आर्थिक ताकद असली तरी पुणेकरांचा कौल शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या मित्रपक्षांना शिवसेना पुण्यात उमेदवार उभे करू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र, काही तासांतच १२० उमेदवार उभे करून शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे, असे सामंत यांनी सांगितले. वेळ मिळाला असता तर १६५ उमेदवारही दिले असते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. पुण्यातील महापौरपद शिवसेनेच्या मदतीशिवाय शक्य नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात तब्बल १२० जागांवर निवडणूक लढवत असून, उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता निकालानंतर महापौर निवडीत शिवसेनेला दुर्लक्ष करता येणार नाही, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. पुणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर होते. त्यामुळे या शहरात विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत सामंत यांनी शिवसैनिकांना प्रचारात आक्रमक होण्याचे निर्देश दिले. संघर्ष हा शिवसैनिकांच्या पाचवीला पूजलेला असून, उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.
स्वतःचा अनुभव सांगताना सामंत म्हणाले, २००४ मध्ये मी पहिली निवडणूक हरलो; मात्र आज पाच वेळा आमदार आहे. जनता नेहमी मेहनती आणि तरुणांच्या पाठीशी उभी राहते. समोरून टीका झाली तर त्याला शब्दांत नव्हे, तर विकासकामांतून उत्तर द्या, असा सल्ला त्यांनी दिला.
ही निवडणूक विकास आणि विश्वासघात यामधील लढाई असून, पुढील १४ दिवस अहोरात्र मेहनत करून पुण्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवा, असे आवाहन करत उदय सामंत यांनी शिवसैनिकांना जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.


