पुणे, – व्यवस्थापन शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यापनातील नवनवीनता आणि संशोधन प्रकाशनातील उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित करणारा एक महत्त्वपूर्ण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अॅण्ड एंटरप्रेन्युअरशिप यांच्या वतीने उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.
“व्यवस्थापन शिक्षणाचा प्रगत विकास: अध्यापनातील नवनवीनता व संशोधन प्रकाशनातील उत्कृष्टता” या विषयावर आधारित हा कार्यक्रम दिनांक १७ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सूर्यदत्ता समूहाचे सीईओ डॉ. शैलेश कासांदे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
डॉ. कासांदे यांनी आपल्या सखोल आणि प्रेरणादायी व्याख्यानात आधुनिक अध्यापन पद्धती, आउटकम-बेस्ड शिक्षण (Outcome-Based Education) तसेच व्यवस्थापन विषयातील संशोधन प्रकाशनाचे विविध पैलू उलगडून दाखवले. बदलत्या शैक्षणिक वातावरणात शिक्षकांची भूमिका आणि त्यांची सतत कौशल्यवृद्धी कशी गरजेची आहे, यावरही त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे संस्थेच्या संचालिका डॉ. पोरीनिता बॅनर्जी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. शीना अब्राहम यांनी कौशल्यपूर्वक पार पाडले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले डॉ. वसीमराजा सय्यद यांचे मनोगत आणि आभारप्रदर्शन, ज्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यरत असलेल्या सर्वांचे आभार मानले आणि सहभागी शिक्षकांना प्रेरणा देणारे विचार मांडले.
हा प्रशिक्षण कार्यक्रम सहभागी शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला असून, व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावृद्धीसाठी असा उपक्रम काळाच्या गरजेनुसार आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.