पुणे- राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही, बंधुता टिकवणे महत्वाचे आहे कारण, लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचे नाते एकमेकांशी सुसंगत आहे. आपल्या अवतीभोवती गरीब-श्रीमंत असे विषमता वातावरण दिसून येते पण आपण ते सहन करतो कारण, आपले अज्ञान आणि सहनशीलता उच्चकोटीची आहे. भौतिक सर्व आविर्भाव बाजूला करून मनुष्य हा समान आहे हे तत्व अंगिकारून त्यात समानता आली पाहिजे असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि सेक्यूलर मूव्हमेंटचे प्रणेते प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘सामाजिक लोकशाहीविना राजकीय लोकशाहीला अर्थ नाही’, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी ‘संविधानाच्या परिप्रेक्षात भारतीय लोकशाहीची वाटचाल – नेहरु ते मोदी’ आणि माजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘बी.एन.रावना संविधानाचे शिल्पकारत्व देण्याचा प्रयत्न’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांच्यासह उद्घाटक अॅड.अभय छाजेड उपस्थित होते.
प्रा. कांबळे म्हणाले, आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडत असताना आपण नेमके काय करतो असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. वाईटाचे चार अंग असून ते म्हणजे भय, श्रद्धा, स्वार्थ, अज्ञान या पायावर ते उभे आहे. बौद्धिक चर्चा करून जर कृती नाही केली तर केवळ चर्चांला अर्थ नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. सामाजिक विषमता देशात मोठ्या प्रमाणात असून हे चित्र बदलण्याची गरज आहे. ठराविक जात आणि धर्म आधारित प्राबल्य हे समूह हुकुमशाहीकडे वाटचाल करणारे आहे. ज्यांनी जात आणि धर्म विचारांची चौकट मोडून वाटचाल केली ते महापुरुष झाले. जाती नष्ट करण्यासाठी जातीची बंधने मोडली पाहिजे. याकरिता जातिनिर्मुलन कायदा अंमलबजावणी केली पाहिजे. प्रचलित निवडणूक पद्धत ही बदलली पाहिजे. आपल्याकडे मताला कोणते महत्व नाही याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीचे चार खांब आज जाती,धर्म आणि भ्रष्टाचार यांनी पोखरलेले आहे त्यामुळे पाचवा खांब “सेक्युलरिझम” निर्माण झाला पाहिजे कारण तो समाजाचा डोलारा पेलू शकतो. अनुदानित शाळा मध्ये कोणतेच धर्म आधारित शिक्षण दिले नाही पाहिजे कारण ते सर्व समाजाच्या विरोधातील आहे.
राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मसुदा समितीचे सहा सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ.आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून सल्लागार बी.एन.राव यांचे नाव त्याकाळी निर्माते म्हणून कोणी घेतले नसल्याचे दिसून येते आणि ते प्रशासकीय सेवक होते. १३ विविध कमिट्यांचे अहवाल एकत्र करून त्यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यात चार महिने आवश्यक ते बदल डॉ.आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण केले आणि त्यानंतर पुढे आवश्यक ते मोठे २० बदल करून अंतिम ड्राफ्ट काम केले. सहा महिने काम केल्यावर राव यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली झाली पुढे संविधान निर्मितीचे काम दीड ते दोन वर्ष सुरू होते त्यामुळे राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे आहे.
लोकशाही मूल्यांचा ऱ्हास सध्या होतो
श्रीराम पवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्याप्रकारे लोकशाही गणराज्य निर्माण झाले तसे चित्र पुर्वी कधी दिसत नव्हते. घटनेने त्याला चांगल्याप्रकारे आकार दिला आणि देशाने पुढे प्रगतीकडे वाटचाल केली. लोकशाहीचे स्वप्न सर्वसामान्य यांच्या हातात घटनेने दिले. पंडित नेहरू यांच्या काळात सर्वाधिक घटनेचे मजबुतीकरण काम झाले कारण त्यांना लोकशाही तत्वांचा प्रचंड आदर होता. नेहरू यांच्याकडे बहुमत असल्याने त्याकाळी हुकुमशाह झाले असते परंतु त्यांनी लोकशाहीची तत्वे देशात रुजवली. मात्र, आता केवळ दोनच लोक देश सध्या चालवत आहे असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातून लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होत आहे. देश कसा चालवावा हे घटनेने सांगितले आहे त्याची अंमलबजावणी राज्यसत्ता करत असते. परंतु ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही.आता निवडणुकीत मते दिल्यावर सत्तेत सर्वसामान्य नागरिकांचा लोकसहभाग दिसत नाही. आज देशात ३० ते ३५ टक्के मते मिळाल्यावर निर्विवाद सत्ता मनमानी पद्धतीने करण्यात येत आहे. लोकशाही सोईने वापरणे पद्धत देशात सुरू आहे. धर्मनिरपेक्ष आज कोणता नेता जाहीर म्हणू शकत नाही. सरकार विरोधात कोणती गोष्ट करू नये असा नकळत संकेत आज रुजला आहे तो चिंताजनक आहे.
संविधानाची मोडतोड प्रकार सध्या सुरू
अॅड छाजेड म्हणाले, जगातील विविध गोष्टींचा अभ्यास करून देशात सर्वोत्तम संविधान तयार करण्यात आले. लोकशाही मध्ये संसद महत्वपूर्ण असून त्यात संविधान मूल्यांचे पालन होते का असा प्रश्न आज निर्माण होत आहे. संविधानाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणे अशी पद्धत सध्या रुढ होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वेगवेगळे स्वातंत्र्य या हक्कावर गदा येत आहे. केशवानंद भारती खटला मध्ये संविधानाचा मूळ ढाचाला धक्का लावता येत नाही असे सांगितले, तरी सध्या विविध प्रकारे संविधानाची मोडतोड प्रकार सुरू आहे. देशात विरोधी पक्षाची राज्य ज्याठिकाणी आहे तिथे राज्यपाल मार्फत सरकारी यंत्रणेवर प्रहार करणे सुरू आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुरुंदवाडकर यांनी केले तर गायिका मोहिनी पवार यांनी विविध गाण्यांचे गायन यावेळी केले. अध्यक्षीय समारोप विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी केल्यावर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश तोंडे यांनी केले.


