पुणे : डिजिटल टेक्नॉलॉजिच्या क्षेत्रात आज झपाट्याने बदल होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात अनेक आव्हाने असली तरीही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठल्याही विषयात पदवी संपादन करीत असाल तरी एआयविषयक छोटे-छोटे अभ्यासक्रम पूर्ण करा, विविध क्षेत्रात कौशल्य प्राप्त करा आणि येणाऱ्या काळाला सामोरे जा असा सल्ला प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील लता मंगेशकर सभागृहात डॉ. शिकारपूर यांचे विज्ञान दिनानिमित्त आज (दि. 28) बीजभाषण आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव, उपप्राचार्य एस. एस. देशमुख, प्रा. डॉ. शिल्पा मुजुमदार आदी उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील देश-विदेशातील करिअरच्या संधींविषयी माहिती देऊन डॉ. शिकारपूर म्हणाले, आज विद्यार्थ्यांनी परदेशी भाषा आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. चौकटीबाहेर विचार करून स्वत:ला सिद्ध करत विविध कौशल्ये विकसित करावीत जेणेकरून आयुष्यात नक्कीच यश मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता हे उत्पादकता वाढविणारे साधन असले तरी त्याचा सजगपणे वापर होणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बरोबर मैत्री करा; परंतु त्यांच्या आहारी जाऊ नका. हे तंत्रज्ञान IT कशाचेही समर्थन करीत नाही, तर्कशास्त्र देत नाही त्यामुळे या तंत्रज्ञानाचा डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना खरे ज्ञान प्राप्त करायचे असल्यास त्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन साचेबद्ध नसावा. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिक्षा हा एक भाग आहे, परिक्षा म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेत असलात तरी मनातून तुम्हाला वेगळ्याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्यास आपल्या मनाचे ऐका आणि आवडत्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधा.
ते पुढे म्हणाले, सार्टअप सुरू करण्याची इच्छा असल्यास आधी कामाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. पुरेसे भांडवल नसेल आणि नियोजनाचा अभाव असेल तर सार्टअप सुरू करण्याची घाई करू नका. विविध विज्ञान संस्थांना भेटी द्या, माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधा, त्यांनी कुठल्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधल्या, ते कोणत्या क्षेत्रात यशस्वी झाले हे जाणून घ्या.