20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानदेशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स चा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स चा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निबे लिमिटेडच्या सुसज्ज मिसाईल व स्माॅल आर्म्स काॅम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न

पुणे, : गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने संरक्षण सज्जतेत मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडियासारख्या योजनांचा योग्य लाभ घेऊन निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस कंपनी ने संरक्षण क्षेत्रातील विविध आयुधे व उपकरणे तयार करण्याच्या दृष्टीने अतिशय कमी वेळेत जोरदार वाटचाल केली आहे. यामध्ये कंपनीचे चेअरमन गणेश निबे यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येत आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस मोलाचा वाटा उचलण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी चाकण येथे केले.

चाकण एमआयडीसीमधील निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्ताने सुसज्ज मिसाईल व स्माॅल आर्म्स काॅम्प्लेक्सचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भोसरीचे आमदार महेश लांडगे, निबे डिफेन्सचे चेअरमन गणेश निबे, सीईओ बालकृष्णन् स्वामी, एल अन्ड टी डिफेन्सचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण रामचंदानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे रायगड गेटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, शिर्डीतील अम्युझमेंट पार्कचे उद्घाटनदेखील करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह या वेळी उपस्थित पाहुण्यांनी कंपनीच्या नवीन काॅम्प्लेक्सची व निबे कंपनीच्या नव्या संरक्षण केंद्रांची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निबे डिफेन्सचे चेअरमन गणेश निबे यांनी कंपनीच्या आजवरच्या वाटचालीविषयी तसेच भविष्यातील घडामोडींविषयी उपस्थितांना माहिती दिली, तसेच निबे डिफेन्स नेहमीच देशाला संरक्षण क्षेत्रात बळकटी देण्याच्या दृष्टीने काम करेल. याशिवाय शासनाने निबे डिफेन्सला २५ एकर जमीन द्यावी, ज्यामध्ये आम्ही नव्या पिढीला संरक्षण क्षेत्रातील प्रशिक्षण तसेच आधुनिक ज्ञान देण्याचे कार्य करू शकू, असेही सांगितले.

या वेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी विविध उपकरणे तसेच मिसाईल व इतर आयुधे बनवण्याच्या दिशेने निबे डिफेन्सची जोरदार वाटचाल सुरू आहे. कंपनीचे चेअरमन गणेश निबे यांनी दूरदृष्टी ठेवून देशाला संरक्षण क्षेत्रात सुसज्जीत करण्याची त्यांची मनीषा वाखाणण्याजोगी आहे. देश आज संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत असून, आपण दरवर्षी हजारो कोटींचे संरक्षण साहित्य आज निर्यात करीत आहोत. येत्या काळात आपल्याला संरक्षण क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्सना मजबूत करायचे आहे. त्यासाठी राज्य शासन फंड उभा करून या स्टार्टअपना बळ देण्याचे काम करेल.

अजित पवार म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी लागणारी उपकरणे तसेच मिसाईल, बंदुका व काडतूस अत्यंत माफक किमतीत तयार करण्याचे काम निबे डिफेन्सकडून करण्यात येत आहे. यातून देशाच्या पैशांची मोठी बचत होणार आहे. दोन लाखात मिळणारी एके-४७ रायफल निबे डिफेन्सकडून केवळ ४० हजारात सरकारला उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय इतर आयुधेदेखील देशाला स्वस्तात मिळणार आहे, त्यामुळे निबे डिफेन्स खरंच कौतुकास पात्र आहे.

उदय सामंत म्हणाले की, देशाला संरक्षण सज्जतेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या निबे डिफेन्सला राज्य शासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल. त्यांचे राज्यात जिथे-जिथे प्रकल्प असतील, त्याच्या विकासासाठी हातभार लावला जाईल.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मूळचे नगर जिल्ह्यातील निबे परिवाराशी असलेल्या आपल्या जुन्या नात्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात विविध कंपन्यांशी करारनामे करण्यात आले. भाग्येश निबे यांनी सर्वांचे आभार प्रकट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!