शहरातल्या प्रवाशांना सुलभ प्रवासाचा आनंद घेता यावा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसमध्ये ‘पुढील थांबा उद्घोषणा’ ही स्वयंचलीत प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ, अपंग, दृष्टीहीन, महिला प्रवाशांना या सुविधेचा फायदा होणार आहे. त्यानुसार ‘पीएमपी’च्या चार हजारांहून अधिक थांब्यांचे उद्घोषणा करणारे ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओ रेकाॅर्डींग) काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या यंत्रणेची चाचणी होणार असल्याची माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.
सार्वजनिक वाहतूक सेवेत मेट्रो, रेल्वे, आणि विमान प्रवाशांसाठी स्वयंचलित घोषणांची सुविधा उपलब्ध हे, मात्र अद्याप ‘पीएमपी’मध्ये या सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे अनेकदा दृष्टिहीन, अपंग आणि वृद्ध प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होणे, नियोजित थांबा ओळखण्यात अडचणी निर्माण होणे, ज्यामुळे थांबे चुकणे, असे प्रकार होत आहे. परगांवावरून आलेल्या प्रवाशाना विशेषत: प्रवाशांची गैरसोय होत असून शहराची ओळख नसल्याने त्यांना नियोजित ठिकाणी जाताना सहप्रवाशांवर अवलंबून रहावे लागत आहे. या नवीन प्रणालीमुळे, त्यांच्या दैनंदिन प्रवासात अधिक स्वातंत्र्य मिळेल. याव्यतिरिक्त, वृद्ध प्रवाशांना ज्यांना बस मार्ग निर्देशक वाचण्यात किंवा अपरिचित थांबे ओळखण्यात अडचण येत असेल त्यांना देखील या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे. पीएमपी’PMPच्या बसला जीपीएस सुविधा बसविण्यात आली आहे. संबंधित बस कोणत्या मार्गावरून धावत आहे, याची मोबाईल ॲपद्वारे माहिती प्राप्त करता येते. याच जीपीएस प्रणालीमध्ये नवीन ‘स्वयंचलीत थांबा उद्घोषणा प्रणाली’ जोडण्यात आली आहे. उद्घोषणा प्रणालीमध्येही साडेचार हजारांहून अधिक थांब्यांंचे ध्वनीमुद्रण एकाच आवाजात करण्यात आले आहे. दोन्ही प्रणाली स्वयंचलीत असल्याने वाहकाला पुढचा थांबा कोणता आहे, हे सांगण्याची गरज भासणार नाही. तसेच आधुनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येईल. ज्या ठिकाणावरून बस मार्गस्थ होईल त्या मार्गावरील पहिला थांबा येण्यापूर्वीच थांब्याची उद्घोषणा होईल. त्यानुसार कालबद्धताही सुनिश्चित करण्यात आली आहे.
