अखेर दोन्ही उपग्रह अंतराळात जोडले
नवी दिल्ली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) isro गुरुवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोने स्पाडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सरसाइज) मोहिमेअंतर्गत दोन उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात डॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करत देशवासियांना खुशखावर दिली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या बाबत माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, भारताने अंतराळ इतिहासात आपले नाव नोंदवले आहे. गुड मॉर्निंग इंडिया, इस्रोने स्पेडेक्स मोहिमेत ‘डॉकिंग’मध्ये ऐतिहासिक यश मिळवलं आहे. या क्षणाचा साक्षीदार असल्याचा देशाला अभिमान वाटतो, असे ट्विट इस्रोने केले आहे. यापूर्वी इस्रोने दोन वेळा डॉकिंगचे प्रयत्न केले होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते ७ आणि ९ जानेवारी रोजी ही मोहीम यशस्वी होऊ शकली नव्हती. १२ जानेवारीला हा उपग्रह १५ मीटर आणि ३ मीटर अंतरापर्यंत आणण्यात इस्रोला यश आले. इस्त्रोने सांगितले होते की, “१५ मीटर आणि नंतर ३ मीटरपर्यंतचे अंतर यशस्वीरित्या पार करण्यात आले आहे. यानंतर उपग्रहांना सुरक्षित अंतरावर नेण्यात आले. डेटाचे विश्लेषण केल्यानंतर डॉकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
स्पाडेक्स मिशनचे महत्त्व
स्पाडेक्स मिशन इस्रोने २० डिसेंबर २०२४ रोजी प्रक्षेपित केली होती. यामध्ये एसडीएक्स०१ (चेसर) आणि एसडीएक्स०२ (टार्गेट) हे दोन छोटे उपग्रह पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत पाठवण्यात आले होते. भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. चांद्रयान-४ सारख्या मोहिमांमध्ये डॉकिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता भासणार आहे, ज्यात चंद्रावरून नमुने आणून ते पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. याशिवाय २०२८ पर्यंत प्रक्षेपित करण्यात येणारे भारताचे अंतराळ स्थानक “इंडियन स्पेस स्टेशन” च्या स्थापनेसाठीही हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.