पुणे,-
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे परिसर येथील पदव्युत्तर वाणिज्य विभाग, अर्थशास्त्र विभाग, जानकी देवी बजाज व्यवस्थापन अध्ययन व संशोधन संस्था, भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञानस्रोत केंद्र आणि भारतीय विद्या भवनचे हजारीमल सोमानी कला व विज्ञान महाविद्यालय, श्री. मनुभाई माणेकलाल शेठ कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय आणि जयरामदास पटेल वाणिज्य व व्यवस्थापन महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘कृत्रिम प्रज्ञा क्रांती – विविध क्षेत्रांतील संधी आणि आव्हाने’ या मुख्य विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन जानकीदेवी बजाज व्यवस्थापन अध्ययन व संशोधन सभागृह, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे येथे करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध लेखक डॉ. अच्युत गोडबोले, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा आणि पुणे आवारप्रमुख प्रा. डॉ. शीतल मोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता दीपप्रज्वलनद्वारे करण्यात आले. या समारंभाच्या सुरुवातीस एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर संगीत विभागाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, एस.एन.डी.टी. विद्यापीठ गीत आणि सोमानी महाविद्यालय गीत सादर केले.
वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रमिला पाटील यांनी परिषद आयोजनामागील भूमिका आणि पाहुण्यांचा औपचारिक परिचय व स्वागत केले. सोमानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. वर्षा मल्लाह यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश्वरी पाटील यांनी प्रमुख वक्ते डॉ. अच्युत गोडबोले यांचा तर डॉ. वर्षा मल्लाह यांनी प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांचा परिचय करून दिला.

उद्घाटनपर भाषणात डॉ. अच्युत गोडबोले यांनी AI मधील वेगवान प्रगती आणि रोजगारावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकला. चॅट जीपीटीच्या माध्यमातून काही सेकंदांत कविता आणि संगीत दिग्दर्शन करून दाखविले. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, तंत्रज्ञानातील बदल झपाट्याने होत असल्याने येत्या दहा वर्षांत नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. त्यांनी इंडस्ट्री ४.० हे पुस्तक वाचण्याची शिफारस केली, जे मशीन लर्निंग आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) यासारख्या संकल्पनांचे स्पष्टीकरण देते.
प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व व AI युगात मानवी संवेदनशीलता टिकवून ठेवण्याची गरज यावर भर दिला. या परिषदेसाठी सादर करण्यात येणाऱ्या शोधनिबंध ग्रंथाचे अनावरण प्रमुख मान्यवर आणि संयोजक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राचा समारोप डॉ. रचना शिखरे, संचालक, जे.डी.बी.आय.एम.एस.आर. यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
विषय सत्र आणि तांत्रिक सत्रे:
सकाळी ११.०० ते १२.३० या वेळात मान्यवर तज्ञांचे खुल्या चर्चासत्राचे प्रास्ताविक व संयोजन डॉ. रचना शिखरे व डॉ. किरण जाधव यांनी केले. प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. प्रकाश काजवे, डॉ. सुजाता कोल्हे आणि प्रज्ञा काशिकर यांचा समावेश होता. त्यांनी श्रोत्यांना आश्वस्त केले की, AI च्या विकासाची भीती बाळगण्याचे कारण नाही, तर चांगल्या मूलभूत कौशल्यांमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील.

भोजनानंतर दुपारी १.३० ते ३.३० या वेळात तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले. तांत्रिक सत्रात वाणिज्य, बहुशाखीय, शिक्षण आणि इतर संबंधित विषयांवर चार तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यातील एक सत्र ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. या सत्रांमध्ये विविध तज्ञ आणि संशोधकांनी AI च्या परिणामांवर सखोल चर्चा केली.
समारोप सत्र
परिषदेच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. मेधा तापियावाला, अधिष्ठाता, मानव शाखा, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई, तसेच अध्यक्ष डॉ. शीतल मोरे उपस्थित होते. प्रा. भरत व्हनकटे, प्राचार्य, एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. संयोजक, सहसंयोजक, आयोजक, सचिव आणि संपूर्ण कार्यकारी मंडळाच्या मेहनतीबद्दल त्यांनी कौतुक करण्यात आले.
या संपूर्ण दिवसाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले आणि समारोप प्रा. डॉ. सुभाष पाटील यांनी आभार प्रदर्शन करून परिषदेचा समारोप केला. परिषदेत AI च्या साहाय्याने विविध क्षेत्रांतील कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चासत्र पार पडले आणि त्याचबरोबर नैतिक मुद्द्यांवर विचार मांडण्यात आला. सदर परिषदेसाठी मुंबई व पुणे येथील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, पीएच.डी. संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
