पुणे / रायगड, ता. १२: रंगद्रव्ये उत्पादनातील अग्रणी कंपनी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने जर्मनीतील ह्यूबॅक समूहासोबत मालमत्ता आणि शेअर डीलच्या अधिग्रहणाबाबत करार केला आहे. सुदर्शन केमिकल्सची ऑपरेशन्स आणि ह्युबॅचच्या तज्ज्ञ तांत्रिक क्षमतांना एकत्र करून हे धोरणात्मक अधिग्रहण जागतिक रंगद्रव्य कंपनी तयार करेल, अशी घोषणा सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांनी विजयादशनीच्या मुहूर्तावर केली.
अधिग्रहणानंतर, एकत्रित कंपनीकडे उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांचा विस्तृत रंगद्रव्य पोर्टफोलिओ असेल. तसेच युरोप आणि अमेरिकेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये त्यांचे भक्कम स्थान असेल. या अधिग्रहणामुळे सुदर्शनचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढणार असून, ग्राहकांना याचा लाभ होण्यासह जागतिक स्तरावर १९ साइट्सवर आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचा ठसा मिळेल. या एकत्रित कंपनीचे नेतृत्व राजेश राठी करणार असून, त्यांच्यासोबत दर्जेदार अंमलबजावणी कौशल्ये आणि तांत्रिक क्षमता असलेली तज्ज्ञ व्यवस्थापन टीम असेल. क्रौफोर्ड बेली आणि नोएरर सुदर्शनसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून, तर डीसी ऍडवायझरी आर्थिक सल्लागार म्हणून काम करत आहेत.
ह्यूबॅक ग्रुपला २०० वर्षांचा इतिहास आहे. २०२२ मध्ये क्लॅरियंटसोबत एकीकरण केल्यानंतर तो जगातील दुसरा सर्वात मोठा पिगमेंट प्लेयर बनला होता. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ह्यूबॅकची उलाढाल एक अब्ज युरोपेक्षा जास्त होती. मात्र, युरोप, अमेरिका आणि एशिया-पॅसिफिक प्रदेशात वाढते खर्च आणि उच्च व्याजदरांमुळे गेल्या दोन वर्षांत समूहाला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. त्यातून सुदर्शनने ह्यूबॅकचे अधिग्रहण केले असून, येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.
या कराराबाबत बोलताना राजेश राठी म्हणाले, “दोन व्यवसायांना एकत्र आणणाऱ्या या व्यवहारामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यातून जागतिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण होतील. फ्रैंकफर्ट हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असून, जागतिक रंगद्रव्य कंपनी तयार करण्यासाठी आम्ही या दोन कंपन्यांचे काळजीपूर्वक एकत्रीकरण करू. सुदर्शन केमिकल्स चपळता आणि कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. ही संस्कृती आम्ही एकत्रित कंपनीमध्ये अंतर्भूत करू. त्यातून ग्राहक केंद्रित आणि फायदेशीर रंगद्रव्य कंपनी होण्यास मदत होईल.”
ह्यूबॅकचे ग्रॅम डीहोंड म्हणाले, “सुदर्शन केमिकल्सला सोबत घेऊन, ग्राहकांना उच्च दर्जाच्या उत्पादनांसह सेवा देण्यासह आमचा दोनशे वर्षांचा वारसा पुन्हा मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. एकत्रितपणे, आम्ही ग्राहक केंद्रित आणि उत्पादन उत्कृष्टतेच्या तत्त्वांवर आधारित रंगद्रव्य उद्योगाचे भविष्य घडवू. आमची एकत्रित क्षमता आमच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यास सक्षम करेल. या पुढील टप्प्यात प्रवेश करताना आम्ही सुदर्शनसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
सुदर्शन-ह्यूबॅकच्या एकीकरणाचे फायदे:
- ग्राहक (सेवा) केंद्रस्थानी असलेली कंपनी बनेल
- ग्राहकांसाठी पसंतीचा पुरवठादार बनण्याची संधी
- जागतिक पुरवठा साखळी अधिक सक्षम होणार
- ग्राहकांना कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी कंपनी सज्ज होईल
- रंगद्रव्ये उत्पादनातील प्रमुख पुरवठादार होईल
- उत्तम आर्थिक सामर्थ्य आणि नफ्यासह जगातील सर्वात महत्त्वाची रंगद्रव्य कंपनी
- सुदर्शन केमिकल्सचा जागतिक बाजारपेठेतील उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार वाढेल
- युरोप, अमेरिकेत सेवेच्या संधीसह १९ जागतिक साइट्सवर ठसा निर्माण होईल
- एकात्मता, चपळता आणि कार्यक्षमतेची संस्कृती अधिक वाढेल
- भागधारकांना मूल्य वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती लागू होणार
- जागतिक दर्जाचे व्यवस्थापक आणि रंगद्रव्य तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली कंपनीची वाटचाल
“ह्यूबॅककडे सानुकूलित उत्पादनांसह मोठ्या प्रमाणात विस्तृत आणि उच्च गुणवत्तेचे उत्पादन पोर्टफोलिओ आहे. हे कोटिंग, प्लास्टिक, इंक, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधील ऍप्लिकेशन्ससह जागतिक ब्लूचीप ग्राहकांच्या मजबूत ग्राहक आधाराची सेवा करते. ह्यूबॅककडे जागतिक स्तरावर १७ उत्पादन साइट्स आहेत जी कोणत्याही भू-राजकीय आणि पुरवठा साखळी आव्हानांमध्ये स्थिरता प्रदान करतात, पुरवठादार आणि ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध सुनिश्चित करतात. त्यामुळे येत्या तीनचार महिन्यात अधिग्रहणाची ही प्रक्रिया विनासायास पार पडेल.”
- राजेश राठी, व्यवस्थापकीय संचालक, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड