पुणे, – चाकण उपविभागातील शेलपिंपळगाव ३३/२२ केव्ही महावितरण उपकेंद्राने गुणवत्ता, सुरक्षा आणि सेवा यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ‘ISO 9001:2015’ चे (MSEDCL ISO 9001:2015 Certified)प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. महावितरणच्या पुणे परिमंडलातील हे दहावे उपकेंद्र ठरले आहे, ज्याला हे मानांकन मिळाले आहे. या उपक्रमासोबतच, येथील वीजपुरवठा सुधारण्यासाठी २२ केव्ही क्षमतेची नवीन (New Kalus 22KV Power Line)‘काळूस वीजवाहिनी’ देखील कार्यान्वित करण्यात आली आहे.
शेलपिंपळगाव उपकेंद्रामध्ये मंगळवारी आयोजित कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते ISO प्रमाणपत्र देण्यात आले आणि नवीन वीजवाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत गाडे आणि चाकणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र गोरे उपस्थित होते.
मुख्य अभियंत्यांच्या निर्देशानुसार, उपकेंद्राचे आधुनिकीकरण करताना गुणवत्ता, पर्यावरणदृष्ट्या अनुकूलतेची काळजी, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण, सुरक्षा उपाय योजना, उपकरणांचे अद्ययावत रूप आणि कामकाज प्रक्रियेत सुधारणा या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली. या सर्वांचे पालन करत हे उपकेंद्र २७ अटी व शर्तींनुसार ISO मानांकनासाठी पात्र ठरले.
नवीन २२ केव्ही ‘काळूस वीजवाहिनी’ मुळे शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, वडगाव, शेलगाव, भोसे, काळूस आणि दौंडकरवाडी या सात गावांतील ६,१५८ वीजग्राहकांना अधिक सुरळीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.
या उपक्रमामध्ये सहायक अभियंता सुरेश माने, प्रधान यंत्रचालक राजेंद्र बिचकर, यंत्रचालक कोमल कांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले.