पुणे, – भारतातील आघाडीचा व्यावसायिक समूह आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची पितृकंपनी असलेल्या मलाबार समूहाने २०२५-२६ मध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, भूक आणि गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि वंचितांसाठी घरे यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या सामाजिक दायीत्व अर्थात सीएसआर उपक्रमांना चालना देण्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
‘द हंगर फ्री वर्ल्ड’ या त्यांच्या प्रमुख सीएसआर उपक्रमांतर्गत, समूहाने भारत आणि झांबियामध्ये दररोज ७०,००० अन्न पाकिटे वंचितांना वितरित करण्याचे वचन दिले आहे, ज्याचे प्रमाण २०२५-२६ मध्ये एकूण २.५० कोटी अन्न पाकिटांवर जाणार आहे. मागील ३ वर्षात २.५ कोटी अन्न पाकिटे वितरित करण्यात आल्याच्या समूहाच्या एकत्रित कामगिरीच्या तुलनेत ही एक महत्त्वपूर्ण झेप दर्शविते आणि वंचित समुदायांसाठी अन्न सुरक्षेच्या उद्दिष्टाप्रती समूहाच्या अधिक दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करते. हा उपक्रम संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय २ – शून्य भूक याच्याशी सुसंगत आहे.
जागतिक भूक दिनानिमित्त, २८ मे २०२५ रोजी नवी दिल्लीतील जनपथ येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात, निती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जी-२० शेर्पा डॉ. अमिताभ कांत यांनी समूहाच्या सीएसआर कार्यक्रमांच्या पुढील टप्प्याची विधिवत सुरुवात केली. याप्रसंगी उपस्थित इतर मान्यवरांमध्ये मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री. एम.पी. अहमद; मलबार समूहाचे उपाध्यक्ष श्री. के.पी. अब्दुल सलाम आणि मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या भारतातील कारभाराचे व्यवस्थापकीय संचालक श्री. ओ. आशर यांचा समावेश होता.
या उपक्रमावर भाष्य करताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले, “सीएसआर हा मलाबार समूहामध्ये आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे आणि आम्ही समाजाला परतफेड करण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही २८ मे हा आमचा वार्षिक सीएसआर दिवस म्हणून साजरा करत असतो; जो आमच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कृतीद्वारे वंचितांच्या पाठीशी उभे राहण्याच्या आमच्या प्रतिज्ञेची पुष्टी करतो. आमचे सीएसआर उपक्रम त्या चिरस्थायी वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत असताना, अधिकाधिक संस्था या मोहिमेत सामील झाल्यास मोठा परिणाम साध्य केला जाऊ शकतो.
हंगर फ्री वर्ल्ड प्रकल्प सध्या भारत आणि झांबियामध्ये दररोज ७०,००० अन्न पाकिटे वितरित करतो. भारतात, २० राज्यांमधील १६७ केंद्रांद्वारे दररोज ६०,००० हून गरजूंना अधिक पोषक तत्वांनी समृद्ध जेवण दिले जाते. झांबियातील तीन शाळांमधील १०,००० विद्यार्थ्यांना दररोज जेवण देण्यासाठी झांबिया सरकारशी समूहाकडून सहकार्य केले गेले आहे. हंगर फ्री वर्ल्ड प्रकल्प आधुनिक सुविधांनी सुसज्ज आणि प्रशिक्षित पाककला तज्ञ आणि स्वच्छता-जागरूक कर्मचारी असलेल्या अत्याधुनिक स्वयंपाकघरांचे संचालन करतो.
शैक्षणिक आणि सामाजिक कल्याणकारी उपक्रमांतर्गत, मलाबार समूहाने संपूर्ण भारतात ७१६ सूक्ष्म-शिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत, जी रस्त्यावरील मुलांच्या प्राथमिक शिक्षण आणि पोषणाची काळजी घेतात. ३२,००० हून अधिक मुलांची या उपक्रमांतंर्गत नोंदणी केली गेली आहे, त्यापैकी ९,००० आधीच औपचारिक शाळांमध्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प थानल या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने चालवला जात आहे. याव्यतिरिक्त, १,१४,००० मुलींना त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी समूहाकडून शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.