मुंबई |
इंडियन पीपल्स फोरम (महाराष्ट्र कौन्सिल) यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या “संयुक्त महाराष्ट्र” या उपक्रमाची पहिली त्रैमासिक बैठक नुकतीच दुबईतील करामा येथील हॉटेल पेशवा येथे पार पडली.
“संयुक्त महाराष्ट्र” ही संकल्पना आयपीएफ महाराष्ट्र कौन्सिलचे प्रमुख, ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक सल्लागार श्री. राहुल तुळपुळे यांनी मांडली. या माध्यमातून यूएईमध्ये कार्यरत असलेल्या विविध सामाजिक, सांस्कृतिक व व्यवसायाशी संबंधित मराठी संघटनांना एका सामायिक व्यासपीठावर आणून मराठी समुदायाला अधिक बळकटी देण्याचा उद्देश आहे. सध्या यूएईतील ३५ संस्था व गट या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. यामध्ये गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम, महाराष्ट्र मंडळ अबू धाबी, महाराष्ट्र मंडळ दुबई यांसारख्या नामांकित संस्थांचाही समावेश आहे.

या संकल्पनेचे उद्घाटन यंदाच्या सुरुवातीला दुबई येथे श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. आज या संस्थांतर्फे साधारण ४ लाखांहून अधिक अनिवासी मराठी बांधवांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये घरगुती कामगारांना मदत, महिला सक्षमीकरण, व्यवसायासाठी मार्गदर्शन, मुलांसाठी साप्ताहिक शाळा, वाचन संस्कृतीचा प्रसार, सांस्कृतिक-धार्मिक वारसा जपणे व प्रादेशिक उत्सव साजरे करणे यांचा समावेश आहे.
बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
- अनिवासी मुलांसाठी मराठी भाषेचा जागतिक स्तरावरील एकीकृत अभ्यासक्रम विकसित करणे, जो महाविद्यालयीन क्रेडिटसाठी पात्र ठरेल.
- यूएईमध्ये स्थानिक सामुदायिक उपक्रमांसाठी समर्पित जागेची आवश्यकता.
- डिसेंबर २०२५ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या मराठी विश्व संमेलनासाठी सक्षम शिष्टमंडळ पाठवणे.
- ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभिजात भाषा सप्ताह साजरा करण्याच्या उपक्रमांमध्ये सहभाग.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यूएई बाजारपेठेत निर्यातीत मदत करण्यासाठी कमोडिटी ट्रेडिंग टास्क फोर्स स्थापन करणे.
बैठकीत श्रीमती नीलम नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त महाराष्ट्र उपक्रमाचे मासिक कार्यक्रम कॅलेंडरही प्रकाशित करण्यात आले. सर्व संस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या भावनेतून अधिक व्यापक व अर्थपूर्ण कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.