पुणे, –
अर्थव्यवस्था सांभाळत असताना लोकांचे मानसिकताकडे देखील पाहणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात विविध जातीचे बेरजेचे राजकारण झाले असून तमिळनाडू मध्ये अन्यायकारक समाजाचे एकत्रित राजकारण केले जात असल्याने आज ते शहर आणि ग्रामीण भागाचा एकत्रित विकास करतात. उत्तरेतील चुकीचे सनातन हिंदुत्ववादी धार्मिक राजकारण महाराष्ट्र मध्ये येते ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्र मध्ये दख्खनी सांस्कृतिक राजकारण असून याठिकाणी वेगळे धार्मिक वातावरण आहे. त्यामुळे धोकादायक वातावरण मधून बाहेर पडले पाहिजे कारण, समाजकारण टिकले तरच अर्थकारण टिकेल. विवेकी समाज आणि त्याला जगण्यासाठी आवश्यक वातावरण, सांस्कृतिक ओळख दिली तर महाराष्ट्र वेगाने आगामी काळात पुढे जाऊ शकेल असे मत अर्थशास्त्रज्ञ नीरज हातेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गांधी भवन, कोथरूड येथे आठ दिवसांचा ‘गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे १४वे वर्ष आहे. यामध्ये अर्थशास्त्रज्ञ नीरज हातेकर यांनी ” अस्वस्थ वर्तमानाचे अर्थशास्त्र” विषयावर व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्वर राजन, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, एम.एस.जाधव, आशिष बेल्हे, स्वप्नील तोंडे, रोहन गायकवाड उपस्थित होते.
नीरज हातेकर म्हणाले, सातत्याने मला वेगळ्या प्रकारची अस्वस्थता सध्या तरुण वर्गात जाणवते आणि आक्रमकता, धार्मिक उन्माद, जातीचे राजकारण अधिक तीव्र होताना दिसून येते. अर्थशास्त्र हे वेगळे नसते तर ते समाजाचे स्वरूप असते. आर्थिक वाढीचे केंद्र सध्या शहरे असून ग्रामीण भाग, खेडे याबाबत मागे पडत आहे. देशाचा जीडीपी वाढला पाहिजे कारण तो आर्थिक दृष्ट्या महत्वाचा असतो. आर्थिक वाढ जगात सन १८५० नंतर होऊ लागली.अन्नधान्य पुरवठा वाढतो त्यावेळी लोकसंख्या देखील वेगाने वाढत असते. त्यामुळे दरडोई उत्पन्न स्थिर राहते. आर्थिक वाढीमुळे मनुष्याचा जगण्याचा स्तर देखील सुधारते. वेगाने अर्थव्यवस्था वाढत असताना त्याचे चांगले_वाईट परिणाम अनेक वर्ष होत होते. पण,अर्थशास्त्रज्ञ यांना त्याचे नेमके कारण अनेक वर्ष समजत नव्हते. नवीन तंत्रद्यान आल्याने उत्पादकता वाढ होऊन अर्थव्यवस्था वेगाने वाढते असे नंतर दिसून आले. नवीन संकल्पनामुळे नवे तंत्रज्ञान निर्माण होत असते. श्रम ,भांडवल आणि संकल्पना हे यातील प्रमुख घटक आहे, त्यामुळे उत्पादकता वाढते. मुंबई सारख्या शहरात अनेक व्यवसाय असून त्याप्रकारे मनुष्यबळ देखील असल्याने अशी शहरे दिवसेंदिवस वाढत आहे.
पुढे ते म्हणाले, एमएसई मध्ये प्रत्येक उद्योग आणि पत्ता,पिनकोड डेटा सविस्तर माहिती असते.राज्यात दर स्क्वेअर किमीला उद्योग परिस्थिती भौगोलिक रचनेनुसार बदलताना दिसते. जिल्ह्याचा जीडीपी काढताना शेती, उद्योग याची माहिती मिळते पण सेवा क्षेत्राची व्यवस्थित माहिती मिळत नाही. गडचिरोली मध्ये दर तीन किमीला एक एमएसई दिसते तर धारावी मध्ये एक किमीला सहा एमएसई आहे. त्यामुळे आर्थिक वाढ ही शहरात होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले ही शहरात मोठ्या संख्येने येत आहे. खेड्यात केवळ जेष्ठ नागरिक राहत आहे. छोट्या गावात रोजगार, पायाभूत सुविधा मर्यादित असल्याने लोकसंख्या दर संबंधित गावात कमी होत आहे. याचे अनेक सामाजिक विपरीत परिणाम होतात. आत्मसन्मानसाठी मनुष्य धर्माचा आधार घेतो अशी परिस्थिती आहे. याचा राजकीय फायद्यासाठी राजकीय व्यक्ती सध्या प्रयत्नशील आहे. २००१ ते २०११ दरम्यान आर्थिक वाढ देशाची मोठी होती आणि दारिद्रय रेषातून अनेकजण बाहेर पडले. परंतु नंतर त्यांच्यात अद्याप अस्वस्थता दिसून येते. बेरोजगार यांना धार्मिक, जातीय भावनिकता आधार देऊन राजकारण केले जात आहे, ही बाब स्फोटक आहे. चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रस्ते, वीज, दळणवळण याबाबत ग्रामीण भागात अधिक काम करणे आवश्यक आहे.

अन्वर राजन म्हणाले,महाराष्ट्र मध्ये प्रबोधनाची अनेक वर्ष परंपरा आहे. याठिकाणच्या राजकारणात त्याने मोठे योगदान दिले आहे. आज आपण विचित्र परिस्थिती मध्ये आहे, राजकीय पक्ष सर्व नापास झालेले आहे. जनतेचा विश्वास कोणताही राजकीय पक्षावर राहिलेला नाही. धर्मांध उन्माद वाढलेला असून अनेक तरुण बेरोजगार आहे. त्यांना योग्य मार्गावर पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. विकास होताना रोजगार कमी निर्माण होत आहे. नवीन रोजगारात आर्थिक स्थैर्य लाभेल अशी परिस्थिती नाही. कंपन्यांचे उत्पादन वाढताना रोजगार घट होत आहे. आर्थिक प्रश्न ईश्वराने नाही तर माणसाने निर्माण केले आहे. आधुनिक काळातील प्रश्नांना गांधी मार्ग अनुसरून पुढे गेले पाहिजे.