पिंपरी,- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित २००९ साली स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या नामवंत व्यवस्थापन महाविद्यालयाने आपल्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून शैक्षणिक स्वायत्तता (‘अकॅडमिक ऑटोनॉमी’) बहाल करण्यात आली आहे. ही स्वायत्तता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या १९९० पासून कार्यरत असलेल्या ख्यातनाम शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे. विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्दिष्टाने ही संस्था अनेक विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यात यशस्वी ठरली आहे.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था नॅक कडून ए प्लस श्रेणीत मानांकित असून, एनबीए मान्यताप्राप्त दोन वर्षांचा पूर्ण वेळ व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए) येथे चालवला जातो. ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. एसबीपीआयएमने आतापर्यंत अनेक शैक्षणिक सन्मान व पुरस्कार प्राप्त केले आहेत. या संस्थेचे बरेचसे विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध नामवंत संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. एसबीपीआयएमला ‘अकॅडमिक ऑटोनॉमी’ मिळाल्या बद्दल पीसीईटीच्या विश्वस्त मंडळाने महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.