पुणे -प्रशासन, प्रत्येक देशाची संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबद्दल जागतिक अनुभव प्रदान करण्याच्या मुख्य उद्देश्याने एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी युरोपियन युनियन देशाचा दौरा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वित्झर्लंड येथील जिनेव्हा, फ्रान्स-पॅरिस, बेल्जियम-ब्रुलेल्स आणि नेदरलँड्स- अॅमस्टरडॅम येथे भेट दिली. यामध्ये जिनेव्हा स्कूल ऑफ डिप्लोमसी, युनायटेड नेशन्स, युनेस्को मुख्यालय, यूनोचे न्यायालय, युरोपियन युनियन संसद, व्हीयू युनिव्हर्सिटी, व्हॅन गॉग म्युझियम आणि अॅन फ्रॅक हाऊस यासारख्या ठिकाणी भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजावून घेतली.
विद्यार्थ्यांच्या या यशस्वी दौर्याबद्दल एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
आयपॅट संस्थेच्या सहकार्याने एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा हा दौरा चित्रसेन गायकवाड यांच्या नेतृत्वात नुकताच संपन्न झाला. यामध्ये दहा विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय दौर्यामध्ये सर्वोच्च शक्तीच्या आंतरराष्ट्रीय संघटना कशा पद्धतीने कार्य करतात, अजेंडा पूर्ण करण्यासाठी देशा देशांमध्ये कशा पद्धतीने समन्वय साधतात हे समजून घेऊन त्यांच्यात संवाद साधण्यात आला. तसेच वरील सर्व देशांमधील इतिहास समजून घेण्यात आला.
राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांशी संबंधित कार्यक्रमाची रुप रेषा जिनेव्हा स्कूल ऑफ डिप्लोमॅसी येथे तयार करण्यात येते. स्कुलचे संचालक डॉ. राकेश कृष्णन यांनी राजकीय क्षेत्रातील एआयचे सादरीकरण केले. तसेच डिजिटल डिप्लोमॅसीसारख्या नव नवीन गोष्टींचे सादरीकरण केले. संयुक्त राष्ट्रसंघाचे जनसंपर्क अधिकारी यांनी येथील कार्य पद्धती सांगितली. यूनोचे शेकडो अधिकारी व १९३ सदस्य राष्ट्रांचे धोरण तयार करण्यासाठी यूनो मधील प्रतिनिधी चे कार्य समजावून सांगितले. त्यानंतर युनोस्को व नाटोचे मुख्यालय, राजकीय व्यवहार आणि सुरक्षा धोरण, युरोपियन युनियनचे न्यायालय, युरोपियन युनियन संसद, व्हीयू विद्यापीठ, व्हॅन गॉग संग्रहालय व अॅन फ्रँक हाऊस यांना भेट दिली.