पुणे, – सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, युनेस्को आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्किल डेव्हलपमेंट अँड टीव्हीईटी (Technical and Vocational Education and Training)’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद शुक्रवार, २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत युनिव्हर्सिटीच्या किवळे, पुणे येथील प्रांगणात होणार आहे. परिषदेचा उद्देश महिलांच्या कौशल्यविकासावर भर देत युनेस्को चेअर स्थापन करण्याकडे लक्ष केंद्रीत करणे हा आहे, अशी माहिती प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी दिली.
परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉ. शां. बं. मुजुमदार, एनएसडीसीचे सीईओ वेद मणी तिवारी, युनेस्को-यूनेवोकचे प्रमुख फ्रेडरिक ह्युबलर, तसेच युनेस्को नवी दिल्लीतील प्रतिनिधी टिम कर्टिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या परिषदेला २० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, भारतातील विविध राज्यांतून तसेच परदेशातून ६०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, तंत्रनिकेतन व व्यावसायिक शिक्षण संस्थांचे प्राचार्य, शिक्षक, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत.
परिषदेतील प्रमुख विषय:
- टीव्हीईटी क्षेत्रात उद्योग-शिक्षण संस्थांमधील भागीदारी
- शिक्षक प्रशिक्षण व संस्थात्मक क्षमतावाढ
- महिलांचे STEM क्षेत्रात वाढते योगदान
- डिजिटल टीव्हीईटी
- उद्योजकता व आर्थिक साक्षरता
- हरित अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक कौशल्ये
प्रमुख सत्रे:
- सकाळी १० – ११: उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय
- दुपारी २ – ३: टीव्हीईटीसाठी क्षमता वृद्धी
- दुपारी ३ – ४.१५: STEM क्षेत्रातील लैंगिक असमानता
समारोप: सायंकाळी ४.१५ वाजता.