पिंपरी :- पुणे शहरामध्ये झिका आजाराचा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये झिका विषाणुचा रुग्ण आढळु नये याकरीता वैद्यकिय विभागाच्या वतीने या आजाराच्या अनुषंगाने प्रतीबंधात्मक उपाययोजना करणेबाबत सुचना देण्यात येत आहेत. (सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये झिका रुग्ण आढळुन आलेला नाही.)(zika virus)
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार आहे. झिका विषाणु हा Flavivirus प्रजातीचा असुन तो एडिस डासामार्फत पसरतो.
झिका आजाराची चिन्हे व लक्षणे –
- बहुसंख्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारा सारखी असतात.
- यामध्ये ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायु दुखणे, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
- ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची आणि २ ते ७ दिवंसापर्यंत राहतात.
- झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे.
- गरोदरपणामध्ये झिका विषाणुची बाधा झाल्यास होणा-या अर्भकाच्या डोक्याचा घेर (Microcephaly) कमी होतो व बाळाच्या मेंदुची वाढ कमी होते असे दिसुन येत आहे.
उपाययोजना –
- झिका विषाणू पसरवणारा एडिस डास दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे दिवसा पुर्ण बाहयांचे कपडे वापरावे.
- Mosquito Repellent चा वापर करावा.
- आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाका.
- घरातील फुलदाण्यातील पाणी दिवसाआड बदला.
- पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाका.
- खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळया बसवा.
- आठवडयातुन एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासुन पुसून कोरडी करा.
- घराच्या परिसरातील अडगळीची साहित्य नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवा.
- तापात ऍ़स्पिरिन किंवा ब्रुफेन अशी औषधे घेण टाळा. ती धोकादायक ठरु शकतात.
- कोणताही ताप अंगावर काढु नका.
- घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच डास चावणार नाही व डास उत्पत्ती होणार नाही
याबाबत काळजी घ्यावी.
- झिका विषाणुग्रस्त व्यक्तीसोबत लैंगीक संबंधातुन सदर विषाणु पसरु शकतो त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी.
उपचार –
- झिका आजारावर कोणतेही विशिष्ठ औषध अथवा लस उपलब्ध नाही.
- रुग्णांवर लक्षणानुसार उपाय करणे आवश्यक असते.
- पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये झिका विषाणुच्या उपचाराकरीता आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार उपलब्ध आहेत.
- उपरोक्त नमुद काही लक्षणे आढळल्यास तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय/दवाखाना येथे संपर्क साधावा.