नवी दिल्ली : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोघांना चिरडल्याने राज्यभरातून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच या कारला नंबर प्लेट नसल्याची व ही कार विनानोंदणी धावत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा हा १७ वर्षांचा होता, मात्र, घटनेनंतर पाच तासांतच त्याला जामीन देण्यात आला, त्यामुळेही संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता आरटीओने काही नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे होणार असून १६ व्या वर्षीदेखील लायसन्स मिळू शकणार आहे.
आरटीओच्या नव्या नियमावलीनुसार, आता ड्रायव्हिंग लायसन्स काढणे सोपे झाले आहे. सरकारने वाहनचालकांसाठी ड्रायव्हिंग लायसेन्स टेस्टसाठी आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध करुन दिल्यामुळे चालकांना आता आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची गरज भासणार नाही. हा नियम १ जून पासून लागू होणार असून लोकांना खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देता येणार आहे. तसेच टेस्टनंतर यासंदर्भातील सर्टिफिकेट ही ड्रायव्हिंग स्कूलमधून दिले जाईल, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात. खासगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रे देण्यात येतील; ज्याच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील.

वैध परवान्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांना आता तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच, अल्पवयीन चालक पकडला गेल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते.परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्येदेखील सुलभता आणण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदाराला कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याबद्दलची यादी आधीच अर्जदाराला देण्यात येईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारण नऊ हजार कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर वाहनांच्या उत्सर्जनासंबंधीचा तपास करून, आपले महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्याकडे भर देण्यात येणार आहे.

असे बदल करण्यात आले असले तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. https://parivahan.gov.in/ या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतात.