पुणे : अभियांत्रिकी शिक्षणाला व्यावहारिक ज्ञानाची व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड देण्यासाठी महावितरण व सिम्बायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल विद्यापीठामध्ये ‘नॉलेज शेअरींग’चा सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महावितरणकडून मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व ‘सिम्बायोसिस’कडून प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी स्वाक्षरी केली. वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, ज्ञानाचे आदानप्रदान, वीजसुरक्षा व महावितरणच्या विविध डिजिटल ग्राहकसेवा व आधुनिक तंत्रज्ञान आदींबाबत सिम्बायोसिस विद्यापीठातील स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी स्टडीजच्या ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी’ विषयातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधून ‘नॉलेज शेअरींग’ करण्यात येणार आहे. मॉडेल कॉलनी येथील ‘सिम्बायोसिस’च्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता डॉ. राजेंद्र पवार आणि प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. यावेळी कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, समन्वयक उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी व डॉ. महेश वाघ यांची उपस्थिती होती.
याआधी महावितरणकडून पुणे परिमंडलाकडून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासह ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयांसोबत ‘नॉलेज शेअरींग’चा सामंजस्य करार झाले आहेत. या करारानुसार सुमारे ९ हजार ५०० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह वीजक्षेत्रातील तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.